मुंबई : मुंबईतल्या स्टुडिओत रविवारी रात्री एका रिअॅलिटी शोच्या चित्रीकरणाच्यावेळी सूत्रधार अभिनेत्री गौहर खान हिच्या कानशिलात लगावण्याचा प्रकार भर स्टेजवर घडला. या घटनेमुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. समाजात महिलांविषयीची संकुचित प्रवृत्ती आढळते, त्यावर हा प्रश्न आधारलेला आहे की सेलीब्रिटी आणि सामान्य माणसात आपोआप जी दरी निर्माण झाली आहे त्यामुळे असे घडले आहे? कारण काहीही असले तरी यामागचे सत्य काहीतरी वेगळेच असल्यासारखे जाणवते. सुरक्षारक्षकांनी केलेल्या दुर्लक्षामुळे असा प्रकार घडल्याचे सध्या मानले जात आहे. कोणत्याही प्रकारचे शूटिंग असो त्यात काम करणाऱ्या कलाकाराच्या सुरक्षेसाठी चोख व्यवस्था केली जाते. खासगी सुरक्षारक्षक यासाठी नेमले जातात. गौहरच्या कार्यक्रमाचे चित्रीकरण ज्या स्टुडिओत सुरू होते तिथे त्या मालिकेतले संपूर्ण कलाकार उपस्थित होते. कार्यक्रम चालू असताना प्रेक्षकातील एक व्यक्ती गौहरच्या इतक्या जवळ येऊन वाट्टेल तसे वागते, हे पटतच नाही. त्यामुळे हे प्रकरण वाटते तितके सोपे असल्याचे वाटत नाही. सुरक्षाव्यवस्था तोडून ती व्यक्ती गौहरच्या इतक्या जवळ येऊच कशी शकली? त्यानंतर त्याने गौहरच्या कानशिलातही मारली. त्या मुलाला लगेच पोलिसांनी ताब्यात घेतले. बिहारमधून काही दिवसांपूर्वी तो मुंबईत आला होता. गौहर नेहमीच तोकडे कपडे वापरत असल्याने तिच्यावर तो नाराज होता. तिला अद्दल घडवण्यासाठी हे कृत्य केल्याचे त्याने पोलीस चौकशीत सांगितले. महत्त्वाचे म्हणजे तिला कानशिलात मारणारा हा युवक मुसलमान आहे. त्यामुळे सामाजिक सलोखा आणि महिलांचे स्वातंत्र्य यांच्याशी हा प्रश्न जोडण्यात आला आहे. महिलांच्या वेशभूषेवरून नेहमीच वाद होतात. पण त्यांनी तोकडे कपडे घातले म्हणून जर कोणी अशी कानशिलात लगावणार असेल तर हे प्रकरण खूपच गंभीर आहे. यावरून समाजातल्या विशिष्ट वर्गाची संकुचित वृत्तीही दिसून येते. २१ व्या शतकात महिलांच्या कर्तृत्वाबाबत, स्वातंत्र्याबाबत अनेक चर्चा होत असताना कपड्यांवरून घडलेला हा प्रकार खरेच लाजिरवाणा आहे. सेलीब्रिटी असण्याचा कसा फायदा-तोटा असतो हेही यानिमित्ताने दिसून येते. गौहर सेलीब्रिटी आहे. बिग बॉससारख्या कार्यक्रमातही ती विजेती ठरली आहे. अनेक चित्रपट-मालिकांमधून कामे करत तिने आपला ठसा उमटवला आहे. पण सेलीब्रिटी आणि सामान्य लोक यांमध्ये नेहमीच एक दुरावा असतो. सेलीब्रिटी जेव्हा लोकांच्यात जातात तेव्हा त्यांना पाहण्यासाठी खूप गर्दी होते. सुरक्षारक्षकांमुळे सामान्यांना सेलीब्रिटींजवळ जाता येत नाही. एक महत्त्वाचा मुद्दा हा की, सोशल मीडियामुळे सेलीब्रिटी आणि चाहत्यांमधील संबंध बदलले आहेत. त्यांच्यातला दुरावा खूप कमी झाला आहे. अशा साइट्सवर कलाकारांच्या फोटो वा प्रतिक्रियांनाही काही चाहत्यांच्या असभ्य शब्दांत प्रतिक्रिया येत असतात. असा मोकळेपणा दोघांमधील अंतर कमी झाल्यामुळेच आला आहे. या प्रकरणाचा पोलीसही तपास करत आहेत. त्यातून सत्य काय ते समोर येईलच. पण त्यासाठी काही काळ वाट पाहावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
गौहरच्या कानशिलामागचे सत्य काय?
By admin | Published: December 03, 2014 2:34 AM