विमानातील ब्लॅक बॉक्सचा उपयोग काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 07:08 AM2018-06-29T07:08:50+5:302018-06-29T07:09:01+5:30
विमान अपघातातील कारणांचा शोध लावण्याच्या उद्देशाने मेलबॉर्नच्या एअरोनॉटिकल रिसर्च लॅबोरेटरीजच्या डेव्हिड वॉरेन याने १९५३ मध्ये ब्लॅक बॉक्सचा शोध लावला.
मुंबई : विमान अपघातातील कारणांचा शोध लावण्याच्या उद्देशाने मेलबॉर्नच्या एअरोनॉटिकल रिसर्च लॅबोरेटरीजच्या डेव्हिड वॉरेन याने १९५३ मध्ये ब्लॅक बॉक्सचा शोध लावला. १९६० मध्ये आॅस्ट्रेलियाने आपल्या सर्व विमानांमध्ये ब्लॅक बॉक्स बसविणे सक्तीचे केले. त्यानंतर भारतातही नागरी विमान महासंचालनालयाच्या नियमांनुसार १ जानेवारी २००५ पासून सर्व विमाने आणि हेलिकॉप्टर्समध्ये सीव्हीआर आणि एफडीआर लावणे सक्तीचे केले आहे.
एखाद्या विमानाच्या अपघाताच्या कारणांचा शोध लावण्यासाठी दोन उपकरणे अतिशय महत्त्वाची असतात. एक म्हणजे विमानाचे फ्लाईट डेटा रेकॉर्डर (एफडीआर) आणि कॉरपिट व्हॉईस रेकॉर्ड (सीव्हीआर), यालाच ब्लॅक बॉक्स असे म्हणतात. यातील एका उपकरणामध्ये कॉरपिटमधील संभाषण रेकॉर्ड होते तर दुसऱ्या उपकरणात विमानाशी संबंधित आकडे, उदाहरणार्थ वेग आणि उंचीच मोजमाप होते. विमानाचा ब्लॅक बॉक्स मिळाल्यानंतर तपासणीसाठी तो प्रयोगशाळेत पाठवला जातो. यात रेकॉर्ड झालेल्या डेटाद्वारे विमान दुर्घटनेच्या कारणांचा पत्ता लागतो.
आतापर्यंत झालेल्या विमान अपघातांमध्ये विमानाचा मागील भाग बºयाचदा सुरक्षित असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच अतिशय कठोर आवरणाने बनवलेल्या ब्लॅक बॉक्सला अतिशय सुरक्षित अशा विमानाच्या मागील बाजूस बसविण्यात येते. अपघाताच्या वेळी आग आणि प्रतिकूल परिस्थितीतही तो सुरक्षित राहावा यासाठी त्यावर अनेक आवरणे बसवलेली असतात. त्यामुळे अतिउष्णतेचा किंवा पाण्याच्या फवाºयाचा यावर काहीही परिणाम होत नाही. इतकेच नव्हे तर समुद्रातही ६००० फुटांवर पाण्याखाली हे उपकरण सुरक्षित राहू शकते.
विमानाच्या मागील पंखांमध्ये बसवण्यात आलेल्या या उपकरणाचा रंग नारंगी असून त्यातून अपघाताच्या अनेक बाबींचा उलगडा होणे शक्य होते.
अपघाताच्या वेळी हा ब्लॅक बॉक्स सहज सापडावा यासाठी त्याचा रंग लाल किंवा नारंगी असा ठेवण्यात आला आहे.