म्हाताऱ्या माणसांसाठी गृहनिर्माण प्रकल्पात काय केलं ? नियमावली महारेराने जाहीर केली
By सचिन लुंगसे | Published: May 16, 2024 02:46 PM2024-05-16T14:46:11+5:302024-05-16T14:46:21+5:30
सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची किमान प्रत्यक्ष निकष/विनिर्देशांची सविस्तर नियमावली महारेराने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे.
मुंबई : सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठीची किमान प्रत्यक्ष निकष/विनिर्देशांची सविस्तर नियमावली महारेराने एका परिपत्रकाद्वारे जाहीर केली आहे. सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठी म्हणून उभ्या राहणाऱ्या सर्व गृहनिर्माण प्रकल्पांसाठीच्या नियमावलीत त्यांच्या प्राथमिक गरजा लक्षात घेऊन इमारतीचे संकल्पचित्र, स्वयंपाकघर, स्नानगृह, उद्वाहन आणि रॅम्पस, जीना, छिन्नमार्ग, प्रकाश योजना आणि वायुविजन, सुरक्षा आणि सुरक्षितता अशा इमारतींशी संबंधित अत्यंत महत्त्वाच्या विविध घटकांबाबत काय काळजी घ्यावी याबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत.
या किमान प्रत्यक्ष निकष/विनिर्देशां निर्देशानुसार हे प्रकल्प बांधावे लागतील. त्यासाठी या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे विकासकांवर बंधनकारक राहणार आहे. ही नियमावली राज्यात लागू करण्यात आलेली आहे. आता विकासकांना या तरतुदींचा विक्री करारातही ( Agreement for Sale) यथायोग्य पध्दतीने समावेश करावा लागेल.
महारेराने फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीच्या गृहनिर्माण प्रकल्पांसाठी आदर्श मार्गदर्शक तत्वांच्या ( Model guidelines) आदेशाचा मसुदा सूचना आणि मतांसाठी जाहीर केला होता.अनेकांनी या प्रस्तावाचे स्वागत करून अनेक उपयुक्त सूचना केल्या. यात ज्येष्ठ नागरिकांच्या संस्थांसोबत काही ज्येष्ठ नागरिकांनी स्वतंत्रपणेही सूचना केल्या आहेत. या निर्देशांना अंतिम स्वरूप देताना या सूचनांचा चांगला उपयोग झालेला आहे.
केंद्रीय गृहनिर्माण आणि नागरी व्यवहार मंत्रालयाने ( Ministry of Housing and Urban Affairs) याबाबतची आदर्श मार्गदर्शक तत्वे यापूर्वी जारी केलेली होती. त्याचा आधार हे निर्देश तयार करताना घेण्यात आलेला आहे. सेवानिवृत्त, जेष्ठ नागरिक या गृहनिर्माण प्रकल्पात प्रत्यक्षात राहायला गेल्यानंतर त्यांना अपेक्षित सोयीसुविधा उपलब्ध असाव्यात, हा महारेराचा हेतू आहे.
यातील काही महत्त्वाच्या तरतुदी अशा...
- एका मजल्यापेक्षा जास्त मजल्याच्या इमारतीला लिफ्ट आवश्यकच आहे. शिवाय व्हीलचेअर किंवा तत्सम साधनांची मदत घेता येईल, अशी रचना असावी.
- इमारतीच्या आतील आणि बाहेरील भागात व्हीलचेअरवर सुध्दा कुठल्याही अडथळ्याशिवाय फिरता येईल असे आरेखन असावे.
- आवश्यक तेथे रॅम्पसची व्यवस्था असावी, त्यादृष्टीने दरवाजेही 900 एमएमपेक्षा मोठे असावे. प्राधान्याने स्लायडिंगचे दरवाजे असल्यास उत्तमच.
- दरवाज्याचे हँडल्स, कड्या सहजपणे व्यवस्थित पकडता येतील असे आणि दणकट असावे.
- यातील फर्निचरही वजनाला हलके, दणकट आणि कुठल्याही अणकुचीदार टोकांशिवाय असावे.
- सर्व लिफ्टला द्रृकश्रव्य व्यवस्था असावी. या लिफ्टमध्ये व्हीलचेअर सहजपणे आतबाहेर करता यावी.
- प्रत्येक इमारतीत स्ट्रेचर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना सहज हालचाल करता येईल, अशी एक लिफ्ट अत्यावश्यक आहे.
- जिन्यांची रुंदी 1500 एमएम पेक्षा कमी नसावी. शिवाय जिन्याच्या दोन्ही बाजुला हँडल्स असावे. पूर्ण उघडा आणि वर्तुळाकार जिना असू नये.
- दोन पायऱ्यांमधील अंतरही फार असू नये. जिनाही 12 पायऱ्यांपेक्षा मोठा असता कामा नये.
- इमारतीच्या काॅरिडाॅरमध्ये कुठेही पायऱ्या असू नये. खूपच गरज असेल तर रॅम्पसची व्यवस्थाही असावी.
- जेथे जेथे छिन्नमार्गाच्या पातळीत फरक असेल तो भाग सहजपणे लक्षात येईल अशा ठळक रंगाने दाखवावा.
- भिंतीलगत गरजेनुसार विशिष्ट उंचीवर हँडल्सही असावेत .
- स्वयंपाकघरात गॅस प्रतिरोधक यंत्रणा असावी.
- स्वयंपाकघरात नैसर्गिक प्रकाश आणि व्यवस्थित वायुविजन व्यवस्था असावी.
- स्नानगृहात सहजपणे पकडता येईल असे हँडल्स वाश बेसीन, शाॅवर,शौचालयाजवळ असावे. हँडल्स दणकट असावेत.
- शौचालयामधील टाॅयलेटपेपर स्टँड खूप वजन पेलू शकणारे असावे.
- शौचालयामध्ये न घसरणाऱ्या टाईल्स असाव्यात.
- शौचालयाचा दरवाजा बाहेर उघडणारा असावा. संकटकाळात त्याचा उपयोग होऊ शकेल.
- इमारतीमध्ये विजेची पर्यायी व्यवस्था असावी. शिवाय प्रत्येक सदनिकेत आणि विशेषतः स्वयंपाकघरात आणि शौचालयातही विजेची पर्यायी व्यवस्था असावी .
- इमारतीच्या परिसरात आणि विशेषतः मुख्य दरवाजा, शौचालय, शयनगृहात आणि सार्वजनिक क्षेत्रात अलार्मची स्वतंत्र बटणं असावीत.
- बेड , शौचालय आणि शाॅवरच्या बाजुलाही आणीबाणीच्या काळात वापरण्यासाठी अलार्मची व्यवस्था असावी.
- सुरक्षा रक्षक ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेण्यासाठी प्रशिक्षित असावे.
- आणीबाणीकाळात संपर्क साधण्यासाठी महत्त्वाचे संपर्क क्रमांक सर्व रहिवाशांना दिलेले असावे. शिवाय हे क्रमांक इमारतीत लिफ्ट आणि इतर सार्वजनिक ठिकाणीही प्रदर्शित केलेले असावे.
ज्येष्ठांच्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या अशा अनेक महत्वाच्या तरतुदी यात सुचविण्यात आलेल्या आहेत. ही किमान प्रत्यक्ष विनिर्देशांची नियमावली राज्यात लागू करण्यात आली असून येथून पुढे सेवानिवृत्त आणि ज्येष्ठांसाठीचे गृहनिर्माण प्रकल्प असा दावा करून प्रकल्प उभा करायचा असेल तर या नियमावलीचे पालन करूनच प्रकल्प उभा करावा लागेल.