मुंबई : निधी वाटपाचे २०१९ ते २०२१ पर्यंत जे सूत्र होते, तेच आम्ही कायम केले आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी विरोधकांनी केलेले आरोप फेटाळले. पुरवणी मागण्यांवरील चर्चेला पवारांनी मंगळवारी विधानसभेत उत्तर दिले.
राज्य सरकारने या अधिवेशनात ४१ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या मांडल्या. त्यावरील चर्चेला उत्तर देण्यासाठी पवार उभे राहिले असता विरोधकांनी निधीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर केवळ सत्ताधारी आमदारांना निधी दिला, अन्य आमदारांना निधी दिला नाही यात तथ्य नसल्याचे पवार म्हणाले.
२०१९ ते २०२१ पर्यंत निधीवाटपाचे जे सूत्र होते तेच कायम असल्याचे पवारांनी सांगताच विरोधकांनी आक्षेप घेतला. काँग्रेसच्या नाना पटोले, नितीन राऊत, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर यांनी गोंधळ घालत पवार यांच्या भाषणात व्यत्यय आणला.
‘त्यांना भाऊबीज म्हणून निधी देऊ’यशोमती ठाकूर या माझ्या भगिनी आहेत, त्यांना भाऊबीज म्हणून जरूर निधी देऊ असे अजित पवार म्हणताच, आम्ही भगिनी असलो तरी सावत्रपणा करू नका, असा टोला यशोमती ठाकूर यांनी लगावला. त्यावर तुम्ही चष्मा बदला, सावत्रपणातून आम्हाला बघू नका, अशी मिश्किल टिप्पणी अजित पवारांनी केली.
शिवसेनेच्या भास्कर जाधव यांनी, तुम्ही फडणवीस यांच्या प्रकल्पांना स्थगिती दिली होती की नाही ते सांगा, असे आव्हान पवार यांना दिले. यावर सत्ताधारी गटाचे आमदारही आक्रमक झाले. पुरवणी मागण्यांवरील विनियोजन विधेयक मताला टाकण्याची मागणी विरोधकांनी केली. मात्र, हे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर करण्यात आले.
पुरवणी मागण्यांचे विधेयक आवाजी मतदानाने मंजूर
‘निधी वाटपात दुजाभाव नाही’
पवार म्हणाले, आम्हाला निधीत भेदभाव करायचा असता तर बाळासाहेब थोरात यांच्या कृषी महाविद्यालयासाठी आम्ही निधी दिला नसता. निधीवाटपात कुठलाही दुजाभाव केला जाणार नाही. कुठल्याही कामाला स्थगिती दिलेली नाही, असेही ते म्हणाले.
अजित पवार निर्मळ मनाचे : पटोले
तुमचे आमचे वैरत्व नाही. पण आमच्या आमदारांना निधी दिला नाही हे बरोबर नाही. अजित पवार निर्मळ मनाचे आहेत. मतदारसंघात २५ कोटी रुपये द्यावेत.
अध्यक्षांनी समविकासाची भूमिका मांडून सरकारला सूचना करावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांनी केली.
४ दिवस सासूचे असतात तसे सुनेचेही...
उत्तर मुंबईतील गोपाळ शेट्टी यांच्या मतदारसंघात अटलबिहारी वाजपेयी यांच्या पुतळा उभारणीसाठी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस आदी नेते होते. त्यावेळी काहींनी या पुतळ्याला विरोध केला असता, हे बरोबर नाही.
चार दिवस सासूचे असतात तसे सुनेचेही असतात. आम्ही कायमचे इथे बसणारे नाही. जनता मागे आहे तोवर इथे बसू, असे सांगत अजित पवार यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.