Join us

२००० कोटींचा घोटाळा, ४६२ कोटींची मालमत्ता अन्... सिद्दिकींच्या हत्येचं कारण ठरला SRA प्रकल्प?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 4:41 PM

मुंबई पोलीस बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागच्या प्रत्येक कारणाचा सखोल तपास करत आहेत.

Baba Siddique Murder Case : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा चेहरा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईतील खेरवाडी सिग्नलजवळील निर्मल नगर भागात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्लेखोरांनी सहा गोळ्या झाडल्या. त्यातील तीन गोळ्या या सिद्दीकी यांना लागल्या. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने  रुग्णालयात दाखल करेपर्यंत त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे. दुसरीकडे  मुंबई पोलीस बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमागच्या प्रत्येक कारणाचा सखोल तपास करत आहेत.

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली असली तरी या हत्येच्या तळापर्यंत जाण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. बाबा सिद्दीकींच्या हत्येमागे त्यांची सलमान खानसोबतची मैत्री आहे की आणखी काही कारण आहे, याचा पोलीस तपास करत आहेत. त्यांच्या हत्येमागे एसआरए पुनर्विकासाचा मुद्दाही कारणीभूत असल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान या प्रकल्पाला विरोध करत होता. पोलीस बाबा सिद्दीकी यांचे नाव ज्या २००० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आले होते त्याचाही तपास करत आहेत. या घोटाळ्यात ईडीने बाबा सिद्दीकी यांची ४६५ कोटी रुपयांची मालमत्ताही जप्त केली होती.

बाबा सिद्दीकी हे २००० ते २००४ या काळात महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष होते. या काळात त्यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले. एका कंपनीच्या फायद्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. बाबा सिद्दीकींनी झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणासाठी पिरॅमिड डेव्हलपर्सला मदत केली होती. पिरॅमिड डेव्हलपर्स ही बाबा सिद्दीकी यांची शेल कंपनी होती. सुमारे दोन हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पात त्यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. त्यानंतर ईडीने २०१८ बाबा सिद्दीकी यांची ४६२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली. ही मालमत्ता वांद्रे पश्चिम येथे असून पीएमएलए अंतर्गत जप्त करण्यात आली.

मुंबई पोलिसांनी मार्च २०१४ मध्ये हा गुन्हा दाखल केला होता. २०१२ मध्ये, अब्दुल सलाम नावाच्या व्यक्तीच्या तक्रारीवरू मुंबई पोलिसांनी बाबा सिद्दीकींसह इतर १५० जणांविरुद्ध एसआरए प्रकल्पातील कथित अनियमिततेप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, आता झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण पुनर्विकास घोटाळ्यामुळे बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली असावी, अस संशय व्यक्त केला जात आहे. 

टॅग्स :बाबा सिद्दिकीमुंबईमुंबई पोलीसगुन्हेगारी