मुंबई : महाराष्ट्र केडरमधून आपली बदली केंद्रात करण्यात यावी, यासाठी अर्ज करणारे आयपीएस अधिकारी संजय पांडे यांच्याबाबत केंद्रीय गृह मंत्रालय कोणता निर्णय घेते, याकडे सध्या पोलीस वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.१९८६ च्या बॅचचे आयपीएस पांडे यांची दोन महिन्यांपूर्वी वजन व मापे विभागातून होमगार्डच्या डेप्युटी कमांडंटपदी बदली करण्यात आली. गेल्या वर्षभरातील त्यांची ही तिसरी बदली आहे. वजन व मापे विभागात नियुक्ती असताना त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळे बिल्डरलॉबीला हादरे बसले होते. त्यामुळेच त्यांची होमगार्डमध्ये बदली करण्यात आल्याची चर्चा पोलीस वर्तुळात आहे. वर्षभरात तब्बल तीन वेळा बदली करण्यात आल्याने अस्वस्थ झालेल्या संजय पांडे यांनी आपली बदली केंद्रात नॅशनल इंटीलिजन्स ग्रीड (नटग्रीड) या विशेष उपक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर व्हावी, यासाठी अलीकडेच अर्ज केला आहे.खरगपूर आयआयटीमधून कॉम्प्युटर सायन्सची पदवी घेतलेल्या संजय पांडे यांनी महाराष्ट्र पोलीस दलात कॉम्प्युटर यंत्रणा रुजवली. राज्य गुन्हा गुन्हा अन्वेषण विभाग तसेच गुन्हेप्रणाली शाखेतील कॉम्प्युटर यंत्रणाही त्यांनी अद्ययावत केली. १९९२ ते १९९७ या कालावधीत ते मुंबईत उपायुक्त होते. १९९२ साली मुंबईतील जातीय दंगलीत त्यांनी संवेदनशील धारावी विभाग समर्थपणे हाताळला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हेविरोधी विभागात काम करताना त्यांनी चर्मोद्योग घोटाळ््याच्या चौकशीत कोट्यवधींचे गैरव्यवहार उघडकीस आणला, तर दहावीचे पेपरफुटीचे प्रकरण हाताळताना त्यांनी केलेल्या तपासामुळे अनेक राजकारण्यांचे धाबे दणाणले. त्यामुळे त्यांच्या बदल्याच होत राहिल्या. कोणतेही सरकार त्यांना महत्त्वाची पोस्टिंग देत नसल्याने गेल्या १५ वर्षांत त्यांच्या १४ बदल्या झाल्या. या पार्श्वभूमीवर पांडे यांनी केलेल्या अर्जाची राज्य पोलीस दलात सध्या चर्चा आहे. प्रामाणिक अधिकारी अशी प्रतिमा असलेल्या पांडे यांना महाराष्ट्र केडरमध्येच योग्य पद देण्यात यावे, अशी भावनाही व्यक्त केली जात आहे. (प्रतिनिधी)
संजय पांडे यांच्या बदलीच्या अर्जाचे काय होणार ?
By admin | Published: December 14, 2015 1:47 AM