मुंबई - राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी गेलेले भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर शिवसैनिकांकडून झालेल्या हल्ल्यानंतर भाजपा नेते शिवसेनेविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. त्यात शिवसेनेविरोधात नेहमीच आक्रमक होणाऱ्या नितेश राणेंनीही भाजपा नेत्यांवर झालेल्या हल्ल्यावरून शिवसेनेला रोखठोक इशारा दिला आहे. राज्यात अघोषित गँगवॉर सुरू झालं आहे. रस्त्यावरच्या लढाईत आमच्या नेत्यांवर मारेपर्यंत गोष्टी पुढे गेल्या आहेत. खार पोलीस स्टेशनसमोर किरीट सोमय्यांवर सिमेंटची विट मारली गेली. मात्र आता उद्या शिवसैनिकांच्या दिशेने दगड यायला लागले. वरुण सरदेसाईंच्या दिशेने दगड आले. आदित्य ठाकरेंच्या दिशेने दगड आले, चपला आल्या तर काय करणार, असा सवाल त्यांनी शिवसेनेला विचारला आहे.
किरीट सोमय्यांची भेट घेतल्यानंतर नितेश राणे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले की, नामर्दानगीने हल्ले करणं आणि पोलीस संरक्षणात हल्ले करणं ह्यालाच उद्धव ठाकरेंची शिवसेना म्हणतात. बाळासाहेबांच्या काळातील शिवसेना पाहिली तर तेव्हा विरोधी पक्षात असतानाही शिवसैनिकांनी अनेक मंत्र्यांना आणि नेत्यांना सळो की पळो करून सोडले होते. आता हा नामर्दांचा प्रकार, नवी शिवसेना समोर आली आहे. त्यांना कसं सामोरं जायचं हे आम्हाला माहिती आहे. म्हणूनच मी ट्विट करून सांगितलं की, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी २४ तासांसाठी पोलिसांना सुट्टी द्यावी. मग या हल्ले करणाऱ्यांचं काय करायचं हे आम्ही पाहू. आम्ही विचारांची लढाई विचारांनी लढू, दगडांच्या भाषेला दगडांनी उत्तर देऊ, गोळ्यांना गोळ्यांनी उत्तर देऊ. आम्हाला सगळे विषय माहिती आहे. पण आम्हाला राज्यातील कायदा सुव्यवस्था खराब करायची नाही आहे.
दरम्यान, आम्हाला जिवे मारण्याचे प्रयत्न झाले तर रिअॅक्शन येणार, तांडव होणार, असा इशाराही नितेश राणे यांनी दिला आहे. रस्त्यावरच्या लढाईत आमच्या नेत्यांवर मारेपर्यंत गोष्टी पुढे गेल्या आहेत. खार पोलीस स्टेशनसमोर किरीट सोमय्यांवर सिमेंटची विट मारली गेली. आता उद्या शिवसैनिकांच्या दिशेने दगड यायला लागले. वरुण सरदेसाईंच्या दिशेने दगड आले. आदित्य ठाकरेंच्या दिशेने दगड आले, चपला आल्या तर काय करणार तुम्ही. ते फिरताहेत ना सगळीकडे. त्यांच्याही रेंज रोव्हर आहेत. त्यांचेही नंबर आमच्याकडे आहेत, असा इशारा नितेश राणे यांनी दिला.
यावेळी नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंच्या कार्यपद्धतीवरही निशाणा साधला. सध्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना काहीही काम राहिलेलं नाही. राणेंचं घर कधी पाडणार, सोमय्यांवर काय केस टाकणार, दरेकरांना कधी अडकवणार, नील सोमय्यांची किती तास चौकशी किती तास करणार एवढंच काम मुख्यमंत्र्यांना उरलं आहे. उद्धव ठाकरेंना सांगतो. पोलीस अधिकारी आयुष्यभर कुणाचे नसतात. ते खुर्चीचे असतात. खुर्ची गेली की त्यांना कळेल, असा टोलाही नितेश राणे यांनी लगावला.