मुंबई - राज्यातील राजकारणाने गत ५ वर्षात अनेक वळणं घेतली आहे. कोणता पक्ष कोणत्या पक्षासोबत जाणार किंवा नाही, कोणता नेता कोणत्या पक्षात जाणार की नाही, यावरील सर्वच गणिते आणि भाकीते खोटी ठरवणारं राजकारण महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे, राजकारणात कुणीही कोणाचं कायम मित्र किंवा शत्रू नसतं ही म्हण सत्यात उतरली आहे. त्याच अनुषंगाने शिवसेना उद्धव बाळासाहे ठाकरे पक्ष पुन्हा भाजपासोबत जाणार का, असा प्रश्न शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारला असता, त्यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं. राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होत आहे. त्याच, अनुषंगाने या प्रश्नावर राऊतांनी उत्तर दिले.
महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे पाहिले जाते. तर, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हेही महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. दुसरीकडे भाजपाने शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला सोबत घेतले आहे. शिवसेनेने गेल्या २५ वर्षांपासून भाजपासोबत असलेली युती तोडल्याने भाजपनेही राजकीय डावपेच करत, शिवसेना पक्षातच फूट पाडली. त्यामुळे, आता उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील का, या प्रश्नावर राऊत यांनी नकार देत भूमिका मांडली.
शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे हे जर भाजपासोबत गेले, तर संजय राऊतांची भूमिका काय असेल?, असा प्रश्न संजय राऊत यांना विचारण्यात आला होता. त्यावर, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे वेगळे आहेत का?, असा प्रतिप्रश्न केला. तसेच, आम्ही भाजपासोब का जावं?, असा सवालही त्यांनी विचारला. ज्यांनी आमच्यावर ही वेळ आणली, त्यांच्यासोबत पुन्हा जाऊ, आम्ही एवढे नालायक आहोत का, असेही राऊत यांनी म्हटले. तसेच, राजकारणात काहीही होऊ शकतं, कुणीही कुणाचा कायम शत्रू नाही, किंवा मित्र नाही. आम्ही काँग्रेससोबत एकत्र येऊ असं कधी कोणाला वाटलं होतं का, पण, आमच्यावर भाजपाने ही वेळ आणली. त्यामुळे, आम्ही आता त्यांच्यासोबत जाणार नाही, असे राऊत यांनी म्हटलं.
दरम्यान, यापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, उद्धव ठाकरे आणि आमच्यात आता मतभेद नाही, तर मनभेद निर्माण झाले आहेत. त्यामुळे, आम्ही पुन्हा एकत्र येऊ असं मला वाटत नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले.
काय म्हणाले अमित शाह
उद्धव ठाकरे यांना पुन्हा भाजपसोबत घेणार का, असा प्रश्न अमित शाह यांना विचारला गेला. त्यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, जर तर ला अर्थ नाही, तुम्हाला काही हेडिंग मिळणार नाही. तुम्ही उगाच वेळ वाया घालवताय. विरोधकांची आघाडी ही फक्त सत्तेसाठी एकत्र आलेली आहे. ज्यांना आपल्या मुलाला, मुलीला, जावयाला मुख्यमंत्री अथवा पंतप्रधान करावं यासाठी एकत्रित आले आहेत. कुणालाही देशाची चिंता नाही. मुलाने मुख्यमंत्री बनावं हे उद्धव ठाकरेंचं लक्ष्य आहे. मुलगा, मुलगी, जावई, भाचे यांना सत्तेच्या पदावर बसवण्याच्या स्वार्थी हेतूने जमलेल्या पक्षांची टोळी आहे, असे म्हणत अमित शाह यांनी थेट उत्तर देणं टाळलं.