लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : यंदा मुंबईत पाणी तुंबू नये म्हणून महापालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. मुंबईच्या ए ते जी उत्तर वॉर्ड मधील ९८ किमी लांब अंतराच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची ‘स्वच्छता’ केली जाणार आहे. पर्जन्य जलवाहिन्या स्वच्छता कामांच्या पहिल्या टप्प्यात ६३ किमी अंतर स्वच्छ करण्यात आले असून दुसऱ्या टप्प्यात ९८ किमी अंतर नियोजित आहे.
मुंबईतील पर्जन्य जलवाहिन्यांचे परिरक्षण व दुरुस्तीविषयक कामे पर्जन्य जलवाहिन्या प्रचालने व परिरक्षण उपविभागामार्फत करण्यात येते. मुंबई शहर व उपनगरे मिळून सुमारे तीन हजार ५०० किलोमीटर लांब अंतराचे पर्जन्य जलवाहिन्यांचे जाळे आहे. यामध्ये लहान-मोठ्या वाहिन्या, रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणाऱ्या वाहिन्या, खुल्या व बंदिस्त, भूमिगत अशा सर्व प्रकारच्या आणि कमानी, बॉक्स, पाइप अशा वेगवेगळ्या आकाराच्या वाहिन्या आहेत. यातील काही वाहिन्या या ब्रिटिशकालीन १०० वर्षांहून अधिक जुन्या असून त्या प्रामुख्याने शहर विभागात आहेत.
दरम्यान, पालिकेने कितीही दावा केला तरी पहिल्या पावसात मुंबई तुंबते अशा प्रतिक्रीया मुंबईकरांनी व्यक्त केल्या आहेत.
अशी होते स्वच्छता
- बंदिस्त व भूमिगत वाहिन्यांमधील गाळ, कचरा हा पाइपच्या मदतीने शोषून बाहेर काढला जातो, त्याचवेळी पाण्याचा मारा करुन वाहिन्यांची स्वच्छताही होते. स्वच्छ झालेल्या वाहिन्यांचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे निरीक्षण केले जाते.
या भागातील पर्जन्य जलवाहिन्यांची होणार स्वच्छता
- शहर विभागातील- ए विभाग ७.५५० किलोमीटर, बी विभाग ११ किलोमीटर, सी विभाग ४.१९८ किलोमीटर, डी विभाग १४.६७९ किलोमीटर, इ विभाग १५.२८३ किलोमीटर, एफ दक्षिण विभाग ६.७२३ किलोमीटर, एफ उत्तर विभाग १३.५६७ किलोमीटर, जी दक्षिण विभाग १२.१४५ किलोमीटर, जी उत्तर विभाग १२.५५३ किलोमीटर असे मिळून एकूण ९८ किलोमीटर लांबीच्या भूमिगत पर्जन्य जलवाहिन्यांची स्वच्छता करण्यात येणार आहे.