आमदार गणपत गायकवाड यांच्या आरोपांवर सरकार काय करणार? जयंत पाटलांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 07:12 PM2024-02-06T19:12:49+5:302024-02-06T19:13:40+5:30
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादात पोलीस ठाण्यातच गोळीबार झाल्याचे समोर आले.
भाजप आमदार गणपत गायकवाड आणि शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यातील वादात पोलीस ठाण्यातच गोळीबार झाल्याचे समोर आले. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. दरम्यान आमदार गायकवाड यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही आरोप केले आहेत. यावरुन आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्य सरकारला सवाल केला आहे.
"शिंदे गटातील कार्यकर्त्यांवर गोळीबार का झाला. कशासाठी झाला? आणि आमदारांनी गोळीबार केल्यानंतर जे वक्तव्य केलं त्या वक्तव्यातून बऱ्याच गोष्टी पुढे आलेल्या आहेत. त्याच काय या सगळ्याची चर्चा झाली पाहिजे. गोळीबाराची चर्चा होईल पण आमदारांनी जे वक्तव्य केलं त्यावर सरकार काय करणार, असा सवालही जयंत पाटील यांनी केला.
मंत्रिपद कसं आणि कुणामुळे मिळालं?; उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना दिलं प्रत्युत्तर
गोळीबारातील दोन रिव्हॉल्वर फॉरेन्सिक लॅबकडे
हिललाईन पोलीस ठाण्यात आमदार गणपत गायकवाड व हर्षल केणे यांनी एकून १० राऊंड फायर केल्याचे उघड झाले. जप्त केलेल्या दोन रिव्हॉल्वर व फायर केलेल्या गोळ्या फॉरेन्सिक लॅबकडे तपासासाठी पाठविणार असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपायुक्त शिवाजी पाटील यांनी दिली आहे.
उल्हासनगरातील हिललाईन पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये २ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वाजता गोळीबारीचा प्रकार घडला आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड व त्यांचे खाजगी सुरक्षारक्षक हर्षल केणे यांनी शिवसेना शिंदे गटाचे कल्याण पूर्वचे शहरप्रमुख महेश गायकवाड व राहुल पाटील यांच्या दिशेने अंदाधुंद गोळीबार केला. यामध्ये एकून १० राऊंड फायर होऊन, गोळीबारात जखमी झालेले महेश गायकवाड यांच्या अंगातून ६ तर राहुल पाटील यांच्या अंगातून २ गोळ्या रुग्णालयात शस्त्रक्रियाद्वारे बाहेर काढल्या आहेत. तर फायर केलेल्या दोन गोळ्या भिंतीवर लागल्या होत्या.