Join us  

आरेतील वन्यजीव व हिरवळ नष्ट करुन आपण काय मिळविणार. आदित्य ठाकरे यांचा सरकारला सवाल

By मनोहर कुंभेजकर | Published: December 11, 2022 5:18 PM

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून विधानसभा क्षेत्रातील आरे, गोरेगाव (पूर्व) येथे साकारण्यात आलेल्या ‘आय लव गोरेगाव’,  ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान’ व  ‘बिरसा मुंडा चौका’ चे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज  करण्यात आले.

मुंबई आरेतील मेट्रोकार शेड कांजुरमार्ग येथे हलविण्याचा पर्याय उपलब्ध असतानाही, विद्यमान सरकारने महाविकास आघाडीचा निर्णय रद्द करुन आरेमध्येच कारशेड करण्याचा निर्णय घेतल्याने आरेतील वन्यजीव व हिरवळ नष्ट करुन सरकार काय साध्य करणार आहे, असा प्रश्‍न शिवसेना नेते व युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज राज्य सरकारला विचारला आहे. 

जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांच्या संकल्पनेतून विधानसभा क्षेत्रातील आरे, गोरेगाव (पूर्व) येथे साकारण्यात आलेल्या ‘आय लव गोरेगाव’,  ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर उद्यान’ व  ‘बिरसा मुंडा चौका’ चे लोकार्पण आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज  करण्यात आले. 

आरे कारशेडला महाविकास आघाडीचा विरोध होता व यापुढेही राहील म्हणुन मुंबईचे फुफ्फुस अशी ओळख असणार्‍या आरेमधील हिरवळ कायम रहावी म्हणुन सुमारे ८०० एकर जागा जंगल म्हणुन घोषित केली. परंतू ईरेस पेटलेल्या विद्यमान सरकारने पुनश्‍च कारशेड आरेमध्येच करण्याचा निर्णय घेतल्याने येथील वन्यजीव व हिरवळ नष्ट करुन सरकारला काय साध्य करायचे आहे, असा प्रश्‍नही ठाकरे यांनी उपस्थित केला.

आरेतील मुख्य रस्त्याप्रमाणेच आरेतील अंतर्गत रस्तेही चांगल्यास्थितीत करण्यासाठीचा फाईलचा प्रवास अंतिम मंजुरीपर्यंत आला असतानाच, कपट कारस्थान करुन महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले. परंतु याची चिंता नाही, कारण महाराष्ट्रात पुढील सरकार हे आपलेच येणार असल्याने, आरेतील अंतर्गत रस्त्यांचा प्रश्‍नही निकाली काढण्यात येईल, असे आश्‍वासन आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले. 

आमदार रविंद्र वायकर म्हणाले की,पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीत आरेतील मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्यासाठी कोटयावधी रुपये दिल्याने सध्या आरेतील दिनकर देसाई हा मुख्य रस्ता सिमेंट कॉंक्रीटचा करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शिवसेनेने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना आद्यक्रांतीकारक मानले होते, आहे व यापुढेही राहतील, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

यावेळी विधानसभा संघटक विश्‍वनाथ सावंत, महिला संघटक रचना सावंत, विधानसभा समन्वयक बाबा साळवी, भाई मिर्लेकर, माजी नगरसेवक रेखा रामवंशी, बाळा नर, प्रविण शिंदे, युवासेना सरचिटणीस अमोल किर्तीकर, उपविभागप्रमुख जितेंद्र वळवी, बाळा साटम, कैलाशनाथ पाठक, जयवंत लाड, शाखा प्रमुख संदिप गाढवे, बाळा तावडे, मंदार मोरे, नंदु ताम्हणकर, अपर्णा परळकर, मयुरी रेवाळे, हर्षदा गावडे, समीक्षा माळी, रोना रावत, डॉ. अमेय पोतनीस, डॉ. राहुल महाले, पुजा शिंदे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

टॅग्स :आदित्य ठाकरे