मुंबई - राज्यावर अतिवृष्टीचं मोठं संकट आलं असून यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कधी आलं नाही असं सकंट राज्यावर आलं आहे. या संकटातून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी सर्वांनी मदत करण्यासाठी पुढं आलं पाहिजे असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे. उस्मानाबाद येथील तुळजापूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी, उदयनराजे भोसले आणि संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेबद्दल पवारांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, पवारांनी टोमणा मारला.
सध्या शरद पवार मराठवाड्याच्या अतिवृष्टी झालेल्या परिसराचा पाहणी दौरा करत आहेत. उस्मानाबादनंतर आज तुळजापूर येथील दौऱ्यादरम्यान, पवार यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्यपाल, एकनाथ खडसे, शेतकऱ्यांना मदत, अतिवृष्टी यांसह विविध मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी, भाजपा नेते आणि खासदार उदयनराजे भोसले आणि खासदार संभाजीराजे भोसले यांच्या मराठा आरक्षणासंदर्भातील भूमिकेबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. या दोन्ही नेत्यांकडून राज्यात एक आणि दिल्लीत वेगळं बोललं जात असल्याचा प्रश्न पत्रकाराने पवार यांना विचारला. त्यावर, पवारांनी मार्मिक उत्तर दिलंय. ''त्यांना प्रश्न कोण विचारणार?, राजांना आम्ही काय सांगणार, ते प्रजेचं काम नाही,'' असे म्हणत पवार यांनी दोन्ही राजेंना टोमणा मारला.
खडसेंच्या प्रवेशाबाबत बोलले पवार
एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत खासदार शरद पवारांनी संकेत दिले आहेत, पत्रकार परिषदेत पवार म्हणाले की, एकनाथ खडसेंनी काय निर्णय घ्यायचा हा त्यांचा प्रश्न आहे. खडसेंचं भाजपच्या उभारणीत मोठं योगदान आहे. विरोधकांच्या बाजूने एकनाथ खडसे प्रखरतेने दिसत होते, पण दुर्देवाने त्यांची नोंद घेतली नाही असं त्यांना वाटतं, त्यामुळे जिथे नोंद घेतली जाईल तिथे जाण्याची भूमिका त्यांची असू शकते असं त्यांनी सांगितलं आहे. पक्ष सोडलेल्यांना परत घेण्याबाबत शरद पवारांनी गेलेत तिथे सुखी राहा असा संदेश दिला आहे.
शहाण्याला शब्दाचा मार
अमित शहांनी राज्यपालांबद्दल केलेल्या या विधानाचा संदर्भ देत शरद पवार यांनी भगतसिंह कोश्यारींवर जोरदार टीका केली. 'राज्यपालांनी वापरलेल्या भाषेवर सर्वच स्तरातून टीका झाली. इतक्या टीकेनंतर आत्मसन्मान असलेली व्यक्ती त्या पदावर राहणार नाही. पण आपण आपल्या पदाची प्रतिष्ठा जपायचीच नाही, असं एखाद्यानं ठरवलंच असेल तर काय करणार?,' अशा शब्दांत पवार राज्यपालांवर बरसतो. मराठीत एक म्हण आहे. शहाण्याला शब्दांचा मार पुरेसा असतो, असा टोलादेखील त्यांनी लगावला.