- मनीषा म्हात्रे मुंबई : पाकिस्तानातून प्रशिक्षण घेऊन मुंबईत आत्मघातकी दहशतवादी कारवाया करण्यासाठी आल्याच्या आरोपाखाली फैझल मिर्झाला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएसने) अटक केली. अशात, घरात उंदिर शिरला, तर त्याला मारायलाही घाबरणारा मुलगा, लोकांना काय मारणार? अशी दु:खद प्रतिक्रिया मिर्झाच्या आईने दिली आहे.जोगेश्वरी येथील बेहरामबाग परिसरातील अर्धवट तोडलेल्या झोपड्यांपैकी एका १० बाय १०च्या घरात मिर्झा कुटुंबीय राहतात. आई, वडील, पत्नी,दोन मुले आणि दोन भावांसोबत फैझल येथे राहतो. दिवसाला अवघ्या ५० ते १०० रुपयांच्या इलेक्ट्रिशियनच्या कामातून मिळणाऱ्या पैशांतून तो घरखर्च भागवत होता, असे त्याच्या आईने सांगितले. पाकिस्तानमध्ये दोन आठवड्यांचे प्रशिक्षण घेऊन तो मुंबईत घातपाती कारवायांसाठी परतल्याच्या आरोपाखाली एटीएसने त्याला अटक केली. तो सध्या एटीएसच्या कोठडीत आहे.या घटनेनंतर आमचे आयुष्यच पालटून गेल्याचे त्याच्या वडिलांनी सांगितले. ‘घर में मातम हो रहा है.. सिर्फ जान देना बाकी है..’ अशी संतापजनक प्रतिक्रिया तणावाखाली असलेले त्याचे वडील हसन यांनी दिली. मुलाने केले, पण शिक्षा आम्ही भोगत आहोत. घरातून बाहेर पडणेही कठीण झाले. ‘मेहनत करून खातो, तरीदेखील हे दिवस बघावे लागत आहेत,’ असे ते म्हणाले.फैझलच्या आईकडे मुलाबाबत विचारताच, त्यांनी हंबरडाच फोडला. ‘माध्यमांवरील चुकीच्या बातम्या बघून जीव नकोसा झाला आहे. मी रक्तदाब, मधुमेहाची रुग्ण आहे. मी मुलांना नेहमी मेहनत करून त्यांना जीवन जगायला शिकविले. फैझल सर्वात लहान मुलगा. त्याला दोन मुले आहेत. त्यापैकी एक नऊ महिन्याचं बाळ आहे. तो नोकरीच्या शोधात होता. त्याला नोकरी मिळणार होती, म्हणून तो एक महिन्यासाठी गेला आणि त्याला फसविले. आजपर्यंत माझी मुले पोलीस ठाण्याची पायरीही चढली नाहीत. साधी किरकोळ भांडणाचीही तक्रार त्यांच्याविरोधात नाही,’ असे त्यांनी सांगितले.फारुखला ओळखत नाही...फैझल हा चुलत भाऊ फारुख डेवडीवालाच्या संपर्कातून पाकिस्तानमध्ये पोहोचल्याची माहिती त्याच्या चौकशीतून उघड झाली. फारुख अंडरवर्ल्डच्या छोटा शकीलचा साथीदार आहे, पण फारुखला ओळखत नसल्याचे त्याच्या आईने सांगितले. याबाबत मुलाकडे विचारणा करा, असेही त्यांनी सांगितले.
ज्याने उंदीर मारला नाही, तो लोकांना काय मारणार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 6:09 AM