अल्टिमेटम म्हंजी काय रं भाऊ?
By admin | Published: September 22, 2014 08:57 PM2014-09-22T20:57:19+5:302014-09-22T22:03:21+5:30
ऐका दाजिबा..
‘आगं ऐकलंस का? बाहेर कोण आलंया बग?’ शिरपानं रखमाला बोलावलं.
‘या बाय. जावईबापू तुमी? एकलंच आलात? माझी लेक आन् नातवंडं नाय आली?’ रखमानं प्रश्नांची सरबत्ती केली.
‘आगं पाव्हण्यास्नी घरात बोलावशील का ‘सेने’नं ‘भाजपा’ला खिंडीत गाठल्यासारखं उंबऱ्यातच आडवून धरणार हायस! जा पाव्हण्यांसाठी च्या कर. ‘च्या’त आलं टाक टिचून जरा. फळकवणी पिऊन त्वांड पार आळणी झालंया. बरं पाव्हणं कसं येणं केलं म्हणायचं?’ शिरपानं चौकशी केली.
‘एकदम बेस चाललंय आमचंं. घरात आन् पार्टीत समदं आलबेल हाय. म्हंजी पार्टीचा उमीदवार फिक्स झाल्यामुळं ‘राष्ट्र’पातळीवर वादा‘वादी’ न्हाय. निदान आमच्यापुरती तरी. त्यामुळं ‘राजा बोले आन् दल हाले’सारखं आमच्याकडं सध्या वातावरण हाय. तुमच्याकडं काय आवस्था हाय?’ जावयानं विचारलं.
‘कसलं आलंया काय. हितं कुणाचा कुणाला नाय मेळ आन् राजकारणाचा झालाया खेळ. आवं गुडघ्याला बाशिंग बांधलेल्यांची ‘पलटण’च हाय हितं; पन् खरा उमीदवार कोण, हे ठरलंया कुठं? सगळी आडकमचेष्टा झालीया! बरं आज कसं येणं केलं?’ शिरपानं विचारलं.
‘त्याचं काय हाय सासरेबुवा, तुमच्या तालुक्यातली चार-दोन गावं आमच्या मतदारसंघात येत्यात. तिथं सांच्याला बैठक हाय.’ जावईबापूंनी सांगितलं.
‘व्वा. व्वा. आतापातूर माणसं फोडल्याचं ऐकीवात होतं, आता आख्खा तालुकाच फोडला! कमाल हाय पुढाऱ्यांची. बरं एक इच्यारू का?’ शिरपा म्हणाला.
‘इच्यारू का म्हणून काय इच्यारता सासरेबुवा. बोला बिनधास्त!’ जावईबापू तोऱ्यात बोलले.
‘आल्टिमेटम का कल्टीमेटम म्हंजी काय वो पाव्हणं?’ शिरपानं शंका विचारली.
‘आता आल्टीमेटम म्हणाल तर ते काय फारसं इशेष नसतं; पण कल्टी म्हत्वाची. म्हंजे यळकाळ बघून माणसाला कल्टी मारता आली पायजे. आता सासुबार्इंच्या तोंडाचा पट्टा सुरू व्हायचा आत मी कल्टी मारतो!’ पायऱ्या उतरत जावईबापू बोलले.
‘काय रं नारू, कुठल्या परीक्षेची तयारी? पुस्तकात त्वांड खुपसून बसलायस ते?’ दाजिबानं विचारलं.
‘आरं डिक्शनरी हाय. ‘आल्टीमेटम’चा अर्थ शोधतूया. आरं ह्याच्या पायतर पंचवीस वरसाची मैत्री तुटायची यळ आलीया म्हणं! म्हंजे धनुष्यानं ‘कमळा’वर ’बाण’ रोखून धरलाय! हा. सापडला एकदाची. आल्टीमेटम म्हंजी निर्वाणीचा इशारा. निर्णय घेण्याची शेवटची मुदत.’ नारू पुटपुटला.
‘ह्याला म्हणायचं चोराच्या उलट्या बोंबा! जनतेला दिलेली आश्वासनं पुरी करायला वेळेचं बंधन नाय आन् स्वत:च्या फायद्यासाठी मात्र निर्वाणीची भाषा?’ दाजिबानं टोला लगावला.
प्रदीप यादव