नगरसेवक करतात तरी काय; नागरिकायन देणार उत्तर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:05 AM2021-02-15T04:05:32+5:302021-02-15T04:05:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मुंबईसह राज्यभरातील महापालिकांतील नगरसेवक नक्की काय कामे करतात, नगरसेवकांना नेमका किती निधी मिळतो, नगरसेवक ...

Whatever the corporators do; Citizen will answer | नगरसेवक करतात तरी काय; नागरिकायन देणार उत्तर

नगरसेवक करतात तरी काय; नागरिकायन देणार उत्तर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबईसह राज्यभरातील महापालिकांतील नगरसेवक नक्की काय कामे करतात, नगरसेवकांना नेमका किती निधी मिळतो, नगरसेवक हा निधी कोणत्या कामावर खर्च करतात, नगरसेवक मुख्यालयात जातात का, नगरसेवकांनी आपल्या पाच वर्षांच्या कारकिर्दीत आपल्या परिसराचा काय विकास केला आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे नागरिकांना माझा नगरसेवक माय कॉर्पोरेटर या अ‍ॅपवर मिळणार आहेत. नागरिकायन संशोधन केंद्राकडून नगरसेवकांचे प्रगती पुस्तक तयार करण्याचे काम माझा नगरसेवक या अ‍ॅपद्वारे हाती घेण्यात आले असून, या द्वारे आजवर ३६ नगरसेवकांची प्रगती पुस्तके तयार करण्यात आली आहेत. आता महिन्याभरात २५ नगरसेवकांचे प्रगती पुस्तक तयार होणार आहेत, अशी माहिती नागरिकायन संशोधन केंद्राचे प्रमुख आनंद भंडारे यांनी लोकमतला मुलाखतीदरम्यान दिली.

-----------------

नागरिकायन नेमके काय आहे, कसे काम करते आहे?

१ मे २०१९ साली नागरिकायन नावाच्या संशोधन केंद्राची स्थापना करण्यात आली. नागरी समस्या सोडविण्यासाठी स्थापन केलेली संस्था सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक वाहतूक, परवडणारी घरे, माृतभाषेतील शिक्षणाचा प्रसार आणि लोकप्रतिनिधींच्या कामाचे मूल्यमापन या विषयांवर काम करत आहे. गेल्या दोन वर्षांपासून लोकप्रतिनिधींच्या कामांचे मूल्यमापन केले जात आहे. माझा प्रभाग, माझा नगरसेवक हे आमच्या प्रकल्पाचे शीर्षक आहे. याद्वारे नगरसेवकाच्या कामाचे प्रगती पुस्तक बनवित आहोत. आतापर्यंत ३६ नगरसेवकांची प्रगती पुस्तके बनविली आहेत. आताही काही नगरसेवकांची प्रगती पुस्तके बनविण्याचे काम सुरू आहे.

-----------------

अ‍ॅपद्वारे नगरसेवकांची माहिती कशी मिळणार?

गेल्यावर्षी आम्ही एक अ‍ॅप आणले. अ‍ॅपचे नाव माझा नगरसेवक माय कार्पोरेटर असून ते ॲण्ड्रॉइड आणि आयओएस या दोन्ही प्रणालींच्या प्लेस्टोअरवर उपलब्ध आहे. राज्यभरातील महापालिकांच्या नगरसेवकांच्या कामांची माहिती लोकांपर्यंत पोहचावी हा याचा हेतू आहे. हे माध्यम ऑनलाइन असल्याने ते सहज हाताळता येते. अ‍ॅपमध्ये नगरसेवकाचे प्रगती पुस्तक पीडीएफ स्वरूपात आहे. आता यात ३६ प्रगती पुस्तके आहेत. मराठीसह काही प्रगती पुस्तके इंग्रजी भाषेतदेखील उपलब्ध आहेत. शिवाय ज्यांना आपल्या नगरसेवकाचे प्रगती पुस्तक बनावयाचे आहे त्या व्यक्तीला सदर अ‍ॅपची मदत होणार आहे. यासाठी संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाइल नंबर आणि शहर याची माहिती त्याला द्यावी लागेल. त्यानंतर पुढील टप्पे असून, वरील माहिती भरली की सहजरित्या पुढील टप्प्यात प्रवेश करता येईल.

-----------------

नगरसेवकांचे मूल्यमापन कसे करणार ?

कोरोना काळात, कठीण काळात आपला लोकप्रतिनिधी कसा वागतो आहे? याचे मूल्यमापनदेखील नागरिकांना करता येईल. नागरिकांमध्ये जागृती व्हावी यासाठी आम्ही सर्वेक्षण सुरू केले आहे. एव्हाना नगरसेवकांनादेखील आपल्याला मिळणा-या निधीद्वारे कोणती कामे करायची हे माहिती नाही. यासाठी आम्ही उमेदवारांसाठी नगरसेवक कसा असावा, यासाठी कार्यशाळा घेतली. त्या कार्यशाळेतील ३ उमेदवार पुढे नगरसेवक म्हणून निवडून आले. याचवेळी नगरसेवक कसा असावा? अशी पुस्तकी तयार केली. ही पुस्तिकाही अ‍ॅपवर आहे.

-----------------

खर्च, हजेरी, विकासकामे यांची माहिती मिळणार का? माहितीचा गैरवापर होईल?

अ‍ॅपमध्ये सादरीकरणाचा एक भाग आहे. फेसबुकचे एक पान आहे. एक संवाद साधण्यासाठी एक क्रमांक आहे. हे अ‍ॅप इंग्रजी आणि मराठी भाषेत आहे. ज्याला आपल्या नगरसेवकाचे प्रगती पुस्तक बनावयचे आहे, अशी कोणतीही व्यक्ती या मोहिमेत सहभागी होऊ शकते. माहिती अधिकार अंतर्गत माहिती कशी आणि कोणती काढायाची याची माहिती यात दिली जाते. माहिती अधिकारांतर्गत खर्च, हजेरी, विकासकामे अशी माहिती काढली जाते. मुंबईत सर्वात जास्त कामे गटाराची होतात. ही कामे सर्वसामान्य माणसाला तपासता येत नाहीत. या मोहिमेद्वारे सर्वसामान्य माणसाला नगरसेवकाने केलेली कामे माहिती करून घेता येतील. माहिती अधिकारांतर्गत प्राप्त होणा-या कोणत्याच माहितीचा गैरवापर होणार नाही.

-----------------

नागरिक, नगरसेवक, महापालिकांकडून काय अपेक्षित आहे?

थोडक्यात आपल्या नगरसेवकाने केलेली कामे माहिती अधिकारांतर्गत आपल्याला मिळण्यासाठी या मोहिमेची मदत होणार आहे. लोकसहभागातून ही मोहीम चालविली जात आहे. मुंबईतल्या कोणत्याही नगरसेवकाने काय कामे केली आहेत, याची माहिती या मोहिमेद्वारे मिळणार आहेत. थोडक्यात नगरसेवकाच्या कामाचे प्रगती पुस्तक अ‍ॅपवर उपलब्ध होणार असून, एकाच जागी सर्व माहिती एका क्षणात उपलब्ध होणार आहेत. तीन महिन्यांत जवळपास १ हजार नागरिकांनी हे अ‍ॅप डाउनलोड केले असून, महापालिकांनीदेखील या मोहिमेला सहकार्य करावे. जेणेकरून नागरिकांना आवश्यक असणारी माहिती लवकर उपलब्ध होईल. अधिकाधिक नागरिकांनी यात सहभागी व्हावे. नगरसेवकांनीदेखील सहकार्य करावे.

Web Title: Whatever the corporators do; Citizen will answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.