Join us

छकुल्याला झालंय तरी काय, लगेच निदान होणार!

By संतोष आंधळे | Published: April 21, 2023 10:01 AM

नायर रुग्णालयात येणार जेनेटिक सेंटर

संतोष आंधळे, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: गेल्या काही वर्षात लहान मुलांमध्ये दुर्मीळ आजाराचे प्रमाण वाढीस लागले आहे. वैद्यकीय विश्वातील नवीन संशोधनाने या आजारांवर उपचार उपलब्ध झाल्याने पालक या उपचारासाठी खर्च करायला तयार असतात. मात्र अनेकदा या दुर्मीळ आजाराचे निदान कठीण होऊन जाते. यासाठी महापालिकेच्या नायर रुग्णालयात आता दुर्मीळ आजारांचे निदान करणारे सेंटर सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अशा पद्धतीचे हे पहिलेच सेंटर आहे.

गेल्या काही दिवसांपासून नायर रुग्णालयाच्या लहान मुलांच्या आजारावरील विभागात जेनेटिक कौन्सिलिंग सेंटरचे काम सुरू करण्यात आले आहे. यामध्ये विशेष मुले, ऑटिझम, फिट्स, डाऊन सिंड्रोम, पचन प्रक्रियेशी निगडित विकार हे आणि असे विविध आजार असलेली मुलाचे निदान करण्याचे काम या सेंटरमध्ये होत आहे.

नायर रुग्णालयात लहान मुलांवरील दुर्मीळ आजारावर उपचार करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची टीम तयार करण्यात आली आहे. यामध्ये दर सोमवारी आणि गुरुवारी लहान मुलाच्या आजरासंबंधी विभागात विशेष बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) आहे त्यावेळी पालक तिथे येऊन तज्ज्ञांना दाखवून उपचार घेऊ शकतात. 

तसेच या ठिकाणी लहान मुलांच्या डॉक्टरांनी त्या रुग्णांचा आढावा घेतल्यानंतर त्यांना लक्षणानुसार उपचार केले जातात. त्या सर्व रुग्णाचा अहवाल बघून त्यांच्या आजाराचे निदान करून त्यांना उपचाराची दिशा ठरवतात.

लहान मुलांच्या आजारावर निदान व उपचाराची दिशा ठरविणारे सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील महापालिकेचे हे एकमेव सेंटर आहे. मोठ्या प्रमाणात गरीब रुग्णांना याचा फायदा होत आहे. कारण दुर्मीळ आजाराचे निदान करून त्यावर कोणते उपचार होतील हे या ठिकाणी सांगितले जाते.  -डॉ, प्रवीण राठी, अधिष्ठाता, नायर रुग्णालय

आमच्या विभागाच्या प्रमुख डॉ. सुरभी राठी यांच्या मार्गदर्शनाखाली हे सेंटर सुरू करण्यात आले आहे. त्याची समाजात खूप सध्या गरज आहे. अनेक गरीब रुग्ण दुर्मीळ आजाराचे निदान न झाल्यामुळे  रुग्णालयात फेऱ्या मारत बसतात. या ठिकाणी आम्ही रुग्णाचे निदान झाल्यानंतर त्यांना उपचार कशा पद्धतीने घेता येतील यावर मार्गदर्शन करतो. येत्या दोन महिन्यांत या सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार आहे. -डॉ. अल्पना कोंडेकर, सहयोगी प्राध्यपक, नायर रुग्णालय

टॅग्स :आरोग्यमुंबईहॉस्पिटल