मुंबई - अभिनेता सोनू सूदने गेल्या काही महिन्यांपासून हजारो प्रवाशांना घरी पोहोचवून त्यांची मदत केली आहे. लॉकडाऊन काळात मुंबईतून परराज्यात आपल्या गावी जाणाऱ्यांसाठी सोनू सूद हा सुपरहिरोच ठरला. या लोकांना मदत करण्याचं त्याचं काम अजूनही सुरूच आहे. त्यातच, आता प्रवाशी मजूरांना त्यांच्या गावात रोजगारही सोनूच मिळवून देणार आहे. प्रवासी मजूरांच्या मदतीपासून सुरू झालेलं त्याचं काम दिवसेंदिवस वाढतच आहे. सोनूने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर करत, वृद्ध आजीबाईंना ऑफरच देऊ केली. महिलांना स्व-संरक्षणाची ट्रेनिंग देण्याचा विचार सोनूने केलाय.
सोनूच्या या सत्कार्यामुळे तो सोशल मीडियावरही सुपरहिरो ठरला असून त्यात दररोजच आणखी कामाची भर पडली आहे. मुलीच्या ऑनलाईन शिक्षणाला गरजेचा स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी एका गरीब कुटुंबाने आपली गाय विकली होती. आता, ती विकलेली गाय परत मिळवून देण्याचं काम सोनूने हाती घेतलं आहे. त्यानंतर, आज सोनूने आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये एक वयोवृद्ध आजीबाई पोटाची खळगी भरण्यासाठी भररस्त्यात दोन हातांनी काठ्या फिरवून कसरत करताना दिसत आहे.
या आजीबाईचा व्हिडिओ पाहून सोनूला चांगली आयडिया सूचली आहे. या आजीबाईंना घेऊन मी महिलांसाठी, मुलींसाठी स्व-संरक्षणाचे ट्रेनिंग देणारे स्कुल सुरू करु इच्छित आहे. कुणी मला या आजीबाई व त्यांच्या संपर्काबद्दल माहिती देता का, असे सोनूने म्हटले आहे. निश्चितच समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलेल्या सोनू सूद आपल्या कामातून कोट्यवधी भारतीयांची मने जिंकत आहे. त्यात, आजीबाईंना दिलेल्या या ऑफरमुळे आणखी भर पडली आहे.