अगला नंबर किसका? पोलीस अधिकाऱ्यांची धाकधूक वाढली!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 03:04 AM2019-07-22T03:04:29+5:302019-07-22T03:04:55+5:30
डान्सबारवरील कारवाई : थेट निलंबनाच्या कारवाईमुळे अधिकाऱ्यांना घाम
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बारवरील कारवाईकडे दुर्लक्ष करणाºया पोलीस अधिकाºयांवर पोलीस आयुक्त संजय बर्वे यांच्या आदेशानुसार थेट निलंबनाची कारवाई होत असल्याने सर्वांनीच मोठ्या प्रमाणात गस्त वाढवत डान्सबारकडे मोर्चा वळविला आहे. त्यातही शनिवारी रात्री पोलीस उपायुक्त शिवदीप लांडे यांनी अंधेरीतील बारवर छापा मारल्यानंतर, ‘अगला नंबर किसका’ असा काहीसा सूर पोलीस दलातून बाहेर पडत आहे. त्यामुळे सर्वांनाच धाकधूक लागली आहे.
अंधेरी-कुर्ला रोडवरील अॅट नाइट लवर्स बार आणि रेस्टारंटमध्ये अश्लील नृत्य सुरू असल्याची माहिती लांडे यांना मिळाली. त्यांनी शनिवारी रात्री १२ वाजता छापा टाकला. तळमजला अधिक २ मजले असे बारचे स्वरूप आहे. यात तळ आणि पहिल्या मजल्यावर दारू आणि जेवण करणाºयांची गर्दी होती. तर दुसºया मजल्यावर असलेल्या दोन हॉलमध्ये १४ बारबाला अश्लील नृत्य करताना आढळून आल्या. त्यानुसार बारबालांची सुटका करत, २५ जणांवर कारवाई केली. ४६ हजारांची रोकड जप्त केली. अटक केलेल्यांमध्ये १ कॅशिअर, १ व्यवस्थापक, १ सुपरवायझर, ७ कर्मचाºयांसह १५ ग्राहकांचा समावेश आहे. या कारवाईमुळे सर्वांचेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करत, २५ जणांना अटक करण्यात आली आहे.
यापूर्वी लांडे यांच्या इंडियाना बारवरील छाप्यानंतर ताडदेव पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार विश्वनाथ सासवेला निलंबित करण्यात आले होते. त्यामुळे आता लांडे यांच्या या छाप्यानंतर कुणावर निलंबनाची कारवाई होणार, यावरून पोलीस दलात चर्चा रंगल्या आहेत. त्यात लांडे पुन्हा बारवरील कारवाईकडे वळल्याने पोलीस अधिकाºयांनीही धसका घेतला आहे.
यापूर्वी केलेली निलंबनाची कारवाई
१५ जुलै : बोरीवली पूर्वेकडील ‘सूर संगीत’ या बारमध्ये डान्सबार सुरू असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त दिलीप सावंत यांना मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने बारवर छापा मारत २० ते २२ बारबालांची सुटका केली. या बारबाहेर पोलीस हवालदार शिवाजी चकणे यांना तैनात करण्यात आले होते. तरीदेखील डान्सबार सुरू असल्याने चकणेसह कस्तुरबा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव पिंपळे, पोलीस निरीक्षक अंबतराव हाके, पोलीस उपनिरीक्षक चेतक गंगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
८ मे : शिवदीप लांडे यांनी गॅ्रण्ट रोड येथील ‘गोल्डन गुंज’ डान्सबारवर केलेल्या कारवाईनंतर गावदेवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोकुळसिंग पाटील यांचे निलंबन करण्यात आले होते.