हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यात गुन्हा काय?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2021 19:46 IST2021-03-09T19:43:04+5:302021-03-09T19:46:10+5:30
Sachin Vaze On Mansukh Hiren Case: देवेंद्र फडणवीसांच्या (Devendra Fadnavis) आरोपांवर सचिन वाझेंनी दिली पहिली प्रतिक्रिया

हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यात गुन्हा काय?, सचिन वाझेंचा फडणवीसांना सवाल
उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार सापडली होती. ती कार मनसुख हिरेन (Mansukh Hiren) यांची असली तरी ती एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्याकडे कशी आली? असा सवाल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपस्थित केला. त्यासोबतच सचिन वाझे यांनीच मनसुख हिरेन यांची हत्या केल्याची शक्यता असल्याचा थेट आरोपही फडणवीस यांनी आज केला. यावर सचिन वाझे यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे.
सचिन वाझे यांनी देवेंद्र फडणवीसांचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा होत नाही, असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. "मनसुख हिरेन यांची गाडी माझ्याकडे असणं किंवा नसणं यात गुन्हा काय? गाडी माझ्याकडे असणं हा गुन्हा आहे का? यात नेमका आरोप काय?", असा प्रतिसवाल सचिन वाझे यांनी केला आहे. (Sachin Vaze Clarification On Devendra Fadnavis Allegations)
मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला हिरेन यांनी नोंदविलेल्या जबाबा संदर्भात विचारलं असता त्यांचा जबाब मी वाचलेला नाही. त्यांनी काय आरोप केलाय हे मला माहित नाही. जबाब वाचतो आणि त्यानंतर उत्तर देतो, असं सचिन वाझे म्हणाले.
फडणवीसांनी काय आरोप केले?
व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्युप्रकरणावरून आज विधानसभेमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या तक्रार अर्जाचा हवाला देत पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्यावर गंभीर आरोप केले. मनसुख हिरेन यांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार मनसुख हिरेन यांचा खून झाला असावा, तसेच तो सचिन वाझे यांनी केला असावा. हिरेन यांना सचिन वाझे आधीपासून ओळखत होते. तसेच हिरेन यांची कार चार महिन्यांपासून सचिन वाझेंकडे होती, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.