... तर माझ्या कार्यकर्त्यांचं काय चुकलं? राजू शेट्टींचा सदाभाऊंना 'कडक'नाथ टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 12:47 PM2019-09-20T12:47:30+5:302019-09-20T12:48:40+5:30
राज्य सरकारमधील एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने, माझा एकेकाळचा सहकारी असं म्हणायलाही मला लाज वाटते.
मुंबई - मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा येणार म्हटल्यानंतर स्वाभिमानी संघटनेचे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले जाते. मोबाईल ट्रॅकिंग करुन, सोशल मीडियावर पाहून कडकनाथ कोंबडीचा आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं जात. पण, कडकनाथ कोंबडीचे घोटाळे करणारे आरोपी सोशल मीडियावर लाईव्ह असून पोलिसांना सापडत नाहीत, हा काय प्रकार आहे? असा प्रश्न माजी खासदार आणि शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थित केला आहे.
राज्य सरकारमधील एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने, माझा एकेकाळचा सहकारी असं म्हणायलाही मला लाज वाटते, असे म्हणत राजू शेट्टींना 'कडक'नाथ टोला लगावला. त्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्र, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या चार राज्यातील 10 हजार गोरगरिबांना फसवलं जात असेल, 450 ते 500 कोटींची लुट होत असेल, तर नेमकं चाललंय काय ? असा प्रश्न उपस्थित करत राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांना लक्ष्य केलं.
लाखो कोंबड्या उपाशी मरत आहेत, त्या हिंसक झाल्यात, त्यांना पशुखाद्य पुरवा किंवा सडकं धान्य तरी पुरवा, अशी मागणी मी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्राद्वारे केली होती. याबाबत मी महादेव जानकर यांनाही बोललो होतो, पण सर्वांनीच दुर्लक्ष केलं, असे शेट्टी यांनी म्हटले. त्यामुळे माझे कार्यकर्ते महाजनादेश यात्रेत कडकनाथ कोंबड्या घेऊन शिरले, त्यावेळी त्यांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला. मी पहिल्यांदाच पाहिलं की पोलीससुद्धा भाजपाचे जर्कीन घालून फिरत होते. सरकारी नोकरसुद्धा लोकांना मारहाण करतात, असं होत असेल तर जनतेचा आक्रोश तुम्हाला समजत नाही का? असे म्हणत राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली.