Join us

"आपलं काय, ते वाकून बघा"; जागावाटपावरुन तटकरेंचा आव्हाडांना टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 7:34 PM

आयुष्यभर बाष्कळपणाचे आणि सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. एकतर ती याचिका काय होती तर आम्हाला चिन्ह मिळू नये ते रद्द करावे

मुंबई - महायुतीच्या लोकसभा जागा वाटपाची बोलणी एक-दोन दिवसात पूर्ण होईल. ४८ जागांचे वाटप सन्मानपूर्वक शुक्रवार किंवा शनिवारी होईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना दिली. महाराष्ट्राच्या दृष्टीकोनातून संबंध चर्चा करणे व ४५ +उद्दीष्ट असल्याने आम्ही सर्वच गोष्टींचा आढावा घेत आहोत. त्यामुळेच विलंब होत असल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केले. यावेळी, तटकरे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर दिलेल्या प्रतिक्रियेवरुन जितेंद्र आव्हाड यांच्यावर पलटवार केला. तर, विजय शिवतारेंवरही हल्लाबोल केला. 

आयुष्यभर बाष्कळपणाचे आणि सतत खोटे बोलणारे आव्हाड आहेत. एकतर ती याचिका काय होती तर आम्हाला चिन्ह मिळू नये ते रद्द करावे. मूळ याचिकेचा गाभा असा होता की, निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून दिलेली मान्यता असेल किंवा घड्याळ हे चिन्ह वापरण्यासाठी जी मान्यता दिली ती रद्द करावी, त्याला स्थगिती द्यावी त्यासाठी हा अट्टाहास केला गेला होता. त्यांना मात्र चपराक बसली आहे. घड्याळ चिन्ह वापरायला परवानगी दिली. 

त्यात सर्वोच्च न्यायालयाला जाहिरात देताना असे का म्हणावे लागले तर त्यांनी युक्तिवाद केला की, शरद पवार नेतृत्व करत असले तरी घड्याळ हे चिन्ह इतके रुजले आहे की पवारसाहेबांना मानणारा वर्ग देखील घड्याळ चिन्हाला मतदान करु शकतो. त्यामुळे आमचा पराजय होऊ शकतो असे बोलण्याची दारुण पाळी युक्तिवादामध्ये आली हे सोयीस्करपणे काही लोक विसरतात असा टोला सुनिल तटकरे यांनी जितेंद्र आव्हाडांना लगावला. इतके वर्ष वापरलेले चिन्ह आणि जनमानसात रुजलेले असल्याने हे झालेले आहे. एकीकडे एक बोलणं आणि दुसरीकडे युक्तिवाद करताना केविलवाणा प्रयत्न करणे हेच या त्यांच्या याचिकेत दिसले. आम्हाला मिळालेले चिन्ह थांबवावे हा त्यामागचा अट्टाहास  होता. मात्र, तो सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावला आहे. त्यामुळे या निर्णयाने आम्ही समाधानी आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले.

आव्हाडांना टोला

सर्रास खोटं बोलणे आणि विपर्यास करणे ही त्यांची आयुष्यातील भूमिका राहिलेली आहे. एकदाच्या जागा वाटप करा आमच्याबद्दल कशाला तुम्ही काळजी करताय तुमच्या वाट्याला किती जागा येतात ते एकदा जाहीर करा... दुसर्‍याचं वाकून बघण्यापेक्षा आपलं काय आहे ते वाकून बघा, असा टोलाही तटकरे यांनी नाव न घेता जितेंद्र आव्हाड यांना लगावला.

विजय शिवतारेंच्या टीकेवरही प्रतिक्रिया

विजय शिवतारे आणि अजितदादा पवार यांचे व्यक्तीगत काही नाही. २०१९ मध्ये मित्रपक्ष सासवड विधानसभा मतदारसंघातील संजय जगताप यांची कॉंग्रेसची जागा होती. काँग्रेसला विजयी करण्यासाठी आणि शरद पवारांबद्दल विजय शिवतारे यांनी जे उद्गार काढले ते अजितदादांना पटले नाहीत. मात्र, आता बालवाडीतील लोक काहीही बोलत असतील त्यांना अजूनही शरद पवार कळायचे आहेत. परंतु त्यांची फारशी दखल आम्ही घेत नाही, अशी मिश्किल टिप्पणी करतानाच त्या कारणासाठीच अजित पवारांनी विडा उचलला आणि असे शत्रूत्व निर्माण झाले. ते सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी, शरद पवारसाहेबांचा अभिमान टिकवण्यासाठी आणि आघाडीचा धर्म पाळण्यासाठी होते. आज जे टिकाटिपण्णी करत आहेत तशी वस्तुस्थिती नाही, असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.  

टॅग्स :सुनील तटकरेजितेंद्र आव्हाडराष्ट्रवादी काँग्रेस