Maharashtra Election 2019 : व्हॉटस्अॅप्वर उमेदवार करत आहेत मतदारांचा पाठलाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 04:52 AM2019-10-12T04:52:14+5:302019-10-12T04:53:21+5:30
मुलुंडमध्ये काँग्रेस उमेदवार गोविंद सिंह, भाजप उमेदवार मिहिर कोटेचासह विक्रोळीत राष्ट्रवादीच्या उमेदवार धनंजय पिसाळ आणि भांडुपमध्ये काँग्रेस उमेदवार सुरेश कोपरकर यांनी वॉर रूम तयार केले आहेत.
मुंबई : सध्या मतदारांची सकाळ आणि रात्र ही उमेदवाराच्या संदेशाने होत असल्याचे चित्र मुलुंड, भांडुप विक्रोळी विधानसभामध्ये पाहावयास मिळते आहे. उमेदवार कोण आहे? तो काय करतो? त्याचा दिनक्रम काय आहे? यासाठी त्याच्या माहितीसह सोशल मीडियाच्या लिंक मतदारांना पाठविण्यात येत आहे.
मुलुंडमध्ये काँग्रेस उमेदवार गोविंद सिंह, भाजप उमेदवार मिहिर कोटेचासह विक्रोळीत राष्ट्रवादीच्या उमेदवार धनंजय पिसाळ आणि भांडुपमध्ये काँग्रेस उमेदवार सुरेश कोपरकर यांनी वॉर रूम तयार केले आहेत. कोणी घराशेजारी तर कोणी कार्यालयालगतच याचे नियोजन केले आहे. यात ५ ते १० जणांची टीम काम करत आहे. कमी वेळात जास्तीतजास्त मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडियाकडे उमेदवार अधिक भर देताना दिसत आहे. या वॉर रूमसाठी उमेदवाराने खासगी संस्थानाच हाताशी धरले आहे. यातून उमेदवाराचा प्रचार, त्याचा अजेंडा मतदारांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. सेनेचे उमेदवार सुनील राऊत यांनी निकालापूर्वीच त्यांच्या विजयाची घोषणा केली आहे. त्यामुळे सोशल मीडिया आणि या वॉर रूमच्या माध्यमातून विक्रोळीत सेना राष्ट्रवादीच्या उमेदवारामध्ये चढाओढ सुरू आहे.
या दोघांच्या चढाओढीत येथील मनसे उमेदवार विनोद शिंदे यांनी प्रत्येक चाळीत, इमारतीसाठी दोन ते तीन जणांचा ग्रुप तयार केला आहे. ही मंडळी तेथे पोहोचून आपले विचार मांडत सोशल मीडियाद्वारेही कनेक्ट होताना दिसताहेत. यात मनसेचे जुने कार्यकर्ते पुन्हा नव्या जोमाने उतरलेले पाहावयास मिळत आहेत़ येथील काही उमेदवार हे अपंग आहे. त्यांच्यासाठी अपंगाच्या संघटनाही प्रचारात उतरत आहेत. एकत्र फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हाट्सपग्रुप करून आपले विचार मांडतानाही दिसत आहेत. त्यांच्या बाबतच्या भावनिक पोस्टदेखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुलुंडमधील मनसेच्या हर्षला चव्हाण या गृहिणींना हाताशी धरून घराघरात पोहोचत आहेत़ यात महिलांचे अनेक ग्रुप तयार करण्यात आले आहेत़