घटस्फोटाचे कारण ठरतेय ‘व्हॉट्सअॅप’ चॅट, अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयाच्या वाटेवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2019 06:02 AM2019-09-29T06:02:56+5:302019-09-29T06:03:20+5:30
व्हॉट्सअॅपमुळे दंगली घडतात. जमावाचे बळी जातात. हाच व्हॉट्सअॅप आता विवाह मोडण्याचे काम करत आहे.
- अमर मोहिते
मुंबई : व्हॉट्सअॅपमुळे दंगली घडतात़ जमावाचे बळी जातात़ हाच व्हॉट्सअॅप आता विवाह मोडण्याचे काम करत आहे़ पत्नी सतत व्हॉट्सअॅपवर असते, म्हणून पतीला घटस्फोट हवा आहे़ अशी एक नाही, तर अनेक प्रकरणे कौटुंबिक न्यायालयाच्या वाटेवर आहेत़
मुंबईतील अशी पाच प्रकरणे अॅड. कौसर देसाई यांच्याकडे सल्लामसलत करत आहेत़ अॅड़ देसाई या पाचही जोडप्यांना सहमतीने घटस्फोट घेण्याचा सल्ला देत आहेत़ त्यातील एका प्रकरणात पत्नी घटस्फोट देण्यास तयार नाही़ पत्नी सतत व्हॉट्सअॅपवर असते़ तिच्याकडे मोबइल मागितला, तर ती काही मिनिटे मोबाइलमध्ये काहीतरी करते आणि मग मोबाइल देते़ बहुतेक ती सर्व डाटा डिलिट करत असावी़ कामामुळे मी आठ तास घराबाहेर असतो़ तिला मोकळा वेळ मिळतो़ या वेळेत ती सतत व्हॉट्सअॅपवर असते़ तिचे कोणासोबत तरी प्रेमसंबंध असतील़ त्यामुळेच मला घटस्फोट हवा आहे, असे पतीचे म्हणणे आहे़ मी जशी घरी आठ तास एकटी असते़ त्याप्रमाणे, पतीदेखील आठ तास कार्यालयात असतो़ तो तेथे काय करतो, हे मला कळत नाही़ माझा मोबाइल मी त्याला देते़ मलाही व्यक्तिस्वातंत्र्य आहे़ त्यावर गदा आणली जाऊ शकत नाही़ माझे विवाहबाह्य संबंध नाहीत़ केवळ व्हॉट्सअॅपवर असते, म्हणून मी घटस्फोट देणार नाही, असा दावा पत्नीने केला आहे़ अॅड. देसाई यांनी या जोडप्याला सहमतीने घटस्फोट देण्याचा सल्ला दिला़ सहमतीने घटस्फोट न झाल्यास प्रकरण न्यायालयात जाईल़ तेथे आरोप-प्रत्यारोप होतील, वेळ जाईल़, असे अॅड. देसाई यांनी या जोडप्याला सांगितले आहे़ त्यावर हे जोडपे निर्णय घेणार आहे़
महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात हीच स्थिती
व्हॉट्सअॅपमुळे घटस्फोट होण्याची अनेक प्रकरणे सल्लामसलत करण्यासाठी येतात़ सोशल मीडियामुळे जोडप्यांमधील संवाद संपत चालला आहे़ व्हॉट्सअॅपमुळे सुरू झालेला वाद घटस्फोटापर्यंत पोहोचतो़ घटस्फोट सहमतीने घ्यावा की नाही, हा त्या जोडप्याचा निर्णय असतो़ मात्र, अशा जोडप्यांचा सहमतीने घटस्फोट व्हावा, यासाठी आम्ही प्रयत्न करतो़ व्हॉट्सअॅपमुळे घटस्फोटाचा निर्णय घेणारी प्रकरणे केवळ मुंबईतच आहेत असे नाही़, महाराष्ट्रासह संपूर्ण देशभर अशी प्रकरणे आहेत़ - अॅड. कौसर देसाई