व्हॉट्सॲप समूहामुळे मिळाले २०० कोरोनाबाधितांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:06 AM2021-04-25T04:06:07+5:302021-04-25T04:06:07+5:30

‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’; राज्यभरातील तरुणांनी एकत्र येऊन समाजसेवेला दिली तंत्रज्ञानाची जोड सुहास शेलार लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ...

WhatsApp group donates lives to 200 corona sufferers | व्हॉट्सॲप समूहामुळे मिळाले २०० कोरोनाबाधितांना जीवनदान

व्हॉट्सॲप समूहामुळे मिळाले २०० कोरोनाबाधितांना जीवनदान

Next

‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’; राज्यभरातील तरुणांनी एकत्र येऊन समाजसेवेला दिली तंत्रज्ञानाची जोड

सुहास शेलार

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढू लागल्यामुळे राज्यात आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. अपुरे बेड, प्लाझ्मा-रक्ताची टंचाई, ऑक्सिजन-रेमडेसिविरची कमतरता अशा अनेक संकटांना तोंड देताना रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक अक्षरशः हतबल आहेत. अशा असाहाय्य रुग्णांना मदत करण्यासाठी राज्यभरातील तरुणांनी एकत्र येऊन व्हॉट्सअप समूह तयार केला असून, या माध्यमातून आतापर्यंत जवळपास २०० कोरोनाबाधितांना जीवनदान मिळाले आहे.

‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’ असे या व्हॉट्सअप समूहाचे नाव आहे. अहमदनगरच्या कल्याणी संध्या अंकुश या तरुणीने ११ एप्रिल २०२१ रोजी या ग्रुपची स्थापना केली आणि अल्पावधीतच त्याचे एका मोहिमेत रूपांतर झाले. सध्या राज्यभरातील ४० तरुण-तरुणी या समूहाशी जोडले गेले आहेत. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, जळगाव, सोलापूर, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांतील गावागावांत त्यांचे काम पोहोचले आहे.

एखाद्या रुग्णाला सुविधा मिळण्यात अडचणी आल्या आणि त्याची माहिती या समूहातील सदस्यापर्यंत पोहोचली की त्यांचे काम सुरू होते. रुग्णालयात बेड उपलब्ध न होणे ही सध्या प्रमुख समस्या आहे. त्यामुळे गंभीर प्रकृतीच्या रुग्णांत वाढ होत आहे. अशा वेळी या ग्रुपमधील सदस्यांमार्फत संबंधित जिल्हा रुग्णालय, वॉर रूम, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याशी संपर्क साधून उपलब्ध सुविधांचा आढावा घेतला जातो. रुग्णाची आरोग्यस्थिती या यंत्रणांच्या कानांवर घालून बेड मिळवून देण्यासाठी सहकार्य मागितले जाते. दिवसभर त्याचा पाठपुरावा केला जातो आणि एकदा बेड उपलब्ध झाला की त्वरित रुग्णाच्या नातेवाइकाला कळवले जाते. अशा प्रकारे आतापर्यंत २०० रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड, रेमडेसिविर, प्लाझ्मा आणि अन्य आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्याचे या समूहाचे सदस्य किरण तांबे यांनी सांगितले.

* रुग्णांच्या चेहऱ्यावरले हसू हेच समाधान...

सध्या राज्यात आरोग्य सुविधांचा प्रचंड तुटवडा असल्यामुळे बऱ्याचदा आम्हांलाही अडचणी जाणवतात. अशा वेळी एखाद्या सदस्याकडे दिवसातून १० जणांनी मदत मागितल्यास त्यांपैकी किमान सातजणांना तरी मदत मिळेल यासाठी पूर्ण टीम प्रयत्न करते. रुग्ण बरा होऊन घरी परतला की त्यांचे नातेवाईक आवर्जून फोन करून आमच्या कामाचे कौतुक करतात. रुग्णाच्या चेहऱ्यावरले हसू नवी ऊर्जा प्रदान करते, अशी प्रतिक्रिया ‘सपोर्ट फॉर कोविड पेशंट’ या समूहाचे सदस्य किरण तांबे यांनी व्यक्त केली.

............................

Web Title: WhatsApp group donates lives to 200 corona sufferers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.