मुंबई : मुंबईकरांना घरबसल्या मनोरंजनाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या केबल व्यवसायाला कोरोनामुळे मोठा फटका बसला. काेराेना, लॉकडाऊन यामुळे जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान झाल्याची माहिती केबल चालक-मालकांनी दिली. शिवकेबल सेनेचे सरचिटणीस विनय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र शासनाच्या बदलत्या धोरणांमुळे २०१७ पासून आर्थिक झळ सोसणाऱ्या केबल व्यवसायाचा कणा कोरोना काळात पुरता मोडून पडला. कामगारांनी गावी स्थलांतर केल्यामुळे ग्राहकसंख्याही कमी झाली. रोजगार गेल्यामुळे काही ग्राहकांनी सेवा बंद केली. वाहतुकीवर निर्बंध असल्यामुळे देयक वसुली थांबली. परिणामस्वरूप कोरोनाकाळात केबल व्यावसायिकांचे जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान झाले. या स्थितीत अद्यापही फारशी सुधारणा झाली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पुरवठादार कंपन्यांकडून दबावतंत्रकोरोनाकाळात देयक वसुली थांबल्याने केबल व्यावसायिक तोट्यात गेले. परिणामी, पुरवठादार (मल्टिपल सिस्टीम ऑपरेटर्स) कंपन्यांकडे त्यांची थकबाकी वाढत गेल्याने त्यांनी वसुलीसाठी तगादा लावला. त्यानंतरही काही व्यावसायिक पैसे भरण्यास असमर्थ ठरल्याने कंपन्यांनी दबावतंत्राचा वापर करीत हिस्सेदारी तत्त्वावर काम करण्यास त्यांना भाग पाडले, अशी माहिती कुर्ल्यातील केबल व्यावसायिक संघटनेचे कायदेशीर सल्लागार ॲड. कमलेश हडकर यांनी दिली.
ग्राहक संख्येत २० टक्क्यांनी घटकोरोनामुळे केबल व्यावसायिकांचे जवळपास ३० ते ४० टक्के नुकसान झाले. ग्राहक संख्येतही २० टक्क्यांची घट झाल्याचे दिसून येते. या स्थितीत अद्यापही सुधारणा न झाल्यामुळे व्यावसायिक चिंतित आहेत.- अरविंद प्रभू, अध्यक्ष, महाराष्ट्र केबल ऑपरेटर्स फाउंडेशनसरकारचे दुर्लक्षतोट्यात असूनही केबल व्यावसायिकांनी कोरोनाकाळात जीएसटी थकविला नाही. सरकारला अडचणीच्या काळात सर्वाधिक महसूल या क्षेत्रातून मिळाला. परंतु, सरकारकडून केबल व्यावसायिकांसाठी कोणताही दिलासादायक निर्णय घेण्यात आला नाही.- विनय पाटील, सरचिटणीस, शिवकेबल सेना
मनाेरंजनात खंड पडू दिला नाहीआम्ही तोट्यात असलो, तरी ग्राहकांच्या मनोरंजनात खंड पडू दिला नाही. वाहतूक निर्बंधांमुळे देयक वसुली रखडली होती, परंतु, ७० ते ८० टक्के ग्राहकांनी ऑनलाइन पद्धतीने देयक भरत सहकार्य केले.- रजनिश हिरवे, केबल व्यावसायिक, कुर्ला