Join us

आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर होताच 'मातोश्रीं'ना अत्यानंद

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 6:17 PM

शिवसेना मेळाव्यातील हा क्षण अतिशय भावुक होता. ठाकरे कुटुंबातूनच पहिल्यांदाच कुणीतरी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहे.

मुंबई - युवासेना प्रमुख आणि ठाकरे कुटुंबातील शिवसेनेचे भावी उमेदवार आदित्य ठाकरेंच्या सक्रीय राजकारणाने मातोश्रींना अत्यानंद झाला आहे. आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या विजयी संकल्प मेळाव्यात स्वत:च आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरेंची उमेदवारी जाहीर झाली आहे. आदित्य यांची उमेदवारी जाहीर होताच, त्यांच्या मातोश्री रश्मी यांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला. आदित्य यांनी उमेदवारी जाहीर केल्यानंतर मातोश्रींकडे जाऊन त्यांचे दर्शन घेतले. 

शिवसेनेने राजकारण केलं नाही समाजकारण केलं, लहानपणापासून राजकारणाची आवड आहे. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरेंनी प्रेम दिलं. ज्येष्ठ शिवसैनिकांचे आशीर्वाद लाभले, या सर्वं शिवसैनिक आणि शिवरायांच्या साक्षीने मी निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर करतो असं सांगत शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. वरळी येथे झालेल्या विजयी संकल्प मेळाव्यात ही घोषणा करण्यात आली. यावेळी तेजस ठाकरे, रश्मी ठाकरे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना खासदार संजय राऊत हे उपस्थित होते. 

शिवसेना मेळाव्यातील हा क्षण अतिशय भावुक होता. ठाकरे कुटुंबातूनच पहिल्यांदाच कुणीतरी विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरले आहे. आदित्य आणि तेजस ठाकरेंनी आदित्य यांच्या उमेदवारीनंतर मातोश्री रश्मी ठाकरेंच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यावेळी, आपला मुलगा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा आनंद रश्मी ठाकरेंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होता. शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री मनोहर जोशींचेही आशीर्वाद घेतले. तसेच, खासदार संजय राऊत यांची गळाभेट घेतली. यावेळी, वरळी मतदारसंघाचे विद्यमान आमदार सुनिल शिंदे यांनी आदित्य यांचे बुके देऊन स्वागत केले. दरम्यान, उद्धव ठाकरे हे बंडखोरी आणि उमेदवारीच्या कार्यक्रमात व्यस्त असल्याने या कार्यक्रमाल उपस्थित राहू शकले नाहीत. 

टॅग्स :शिवसेनाआदित्य ठाकरेविधानसभा निवडणूक 2019