मुंबई - ऑनलाईन शॉपिंग क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी असलेल्या अमेझॉन कंपनीने भारतात हजारो किराणा दुकानादारांसोबत भागिदारी केली आहे. संपूर्ण भारतात स्थानिक किराणा दुकानाच्या माध्यमातून सेवा देण्याचा अमेझॉनचा प्रयत्न आहे. ग्राहक आणि दुकानदार या दोघांसाठी अमेझॉनची ही योजना फायदेशीर ठरणार आहे. अमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांनी याबाबत ट्विट करुन माहिती दिली.बेझोस हे या किराणा स्टोअर्स भागिदारी योजनेच्या निमित्ताने चौथ्यांदा भारतात आले होते. बेझोस यांनी ट्विट करुन स्थानिक दुकानदारांसोबत आपण भागिदारी व्यवसाय सुरू केल्याची माहिती दिली.
यामुळे ग्राहकांचा फायदा होणार आहे. तर, दुकानादारांनाही अतिरिक्त कमाई मिळणार असल्याचे त्यांनी म्हटलंय. मुंबईतील एका लोकल किराणा दुकानातून बेझोस यांनी आपल्या हाताने अमेझॉनची एक डिलिव्हरी दिली. बेझोस यांनी ट्विटरवरुन किराणा दुकानदारासोबतचा फोटो शेअर करत, दुकानदार अमोलचे आभार मानले आहेत. भारतात जवळपास 1 कोटी अशा किराणा दुकानदारांसोबत अमेझॉन जोडले गेले आहे. मॉम अँड पॉप स्टोअर्स असे या किराणा दुकानाच्या संकल्पनेला नाव देण्यात आले आहे.