भिवंडी कचरामुक्त कधी?
By admin | Published: January 20, 2015 11:04 PM2015-01-20T23:04:30+5:302015-01-20T23:04:30+5:30
भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने प्रत्येक वॉर्डातून घराघरांतील कचरा जमा करून सार्वजनिक कचराकुंड्या मुक्त शहर करण्याचे स्वप्न दाखविले,
भिवंडी : भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने प्रत्येक वॉर्डातून घराघरांतील कचरा जमा करून सार्वजनिक कचराकुंड्या मुक्त शहर करण्याचे स्वप्न दाखविले, परंतु वर्षभरापासून ही यंत्रणा कमकुवत ठरली असून आरोग्य विभागाच्या उपायुक्त विजया कंठे व स्वच्छता विभागाचे एम.एल. सोनावणे हे केवळ घंटागाडीचा फार्स करून लोकांच्या जीवाशी खेळत आहेत, असा नागरिकांचा आरोप आहे.
महानगरपालिकेच्या स्वच्छता विभागाने रोख पद्धतीने ठेकेदार नेमून घंटागाड्या सुरू केल्या, परंतु या घंटागाड्या घरोघरी जाऊन घंटा वाजवून कचरा जमा करण्याऐवजी भाजीपाला मार्केट, हॉटेल, खाणावळी आणि दुकानांतून ओला व सुका कचरा उचलतात आणि त्यांची विक्री करतात तसेच हॉटेलधारकांकडूनही काही चिरीमिरी घेतात, असा आरोप शहरातील नागरिकांकडून केला जात आहे. काही घंटागाड्या कचराकुंडीतील कचरा उचलतात. मात्र, शहरातील नागरिकांकडून कचरा जमा करीत नाही, म्हणून नागरिक कचराकुंडीत कचरा टाकतात. मात्र, स्वच्छता विभागाने शहरातील कचराकुंड्या उचलून कचराकुंड्यामुक्त भिवंडी करीत स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मात्र, त्या सर्व ठिकाणी दररोज घरगुती व सार्वजनिक कचरा जमा होत आहे. हे स्वच्छता विभागाचे अपयश आहे. तसेच कचराकुंडीच्या ठिकाणी जमा होणारा कचरा डम्परमधून न उचलता तो घंटागाडीच्या नावाने ठेवलेल्या छोट्या टेम्पोतून उचलला जातो आणि महासभेला खर्च कमी झाल्याची बतावणी केली जाते. त्यामुळे भिवंडी महानगरपालिका क्षेत्र कचरामुक्त झाले नसून नित्याने जमा होणाऱ्या कचऱ्याने व तो नियमित उचलला न गेल्याने वाहतुकीच्या रस्त्यावर दुर्गंधी पसरल्याचे व घाण साचल्याचे दृश्य दिसते. तसेच सरकारी सुटीच्या काळात ही सफाई होत नसल्याने सणांच्या दिवशी नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. घंटागाडी असूनही त्याचा फायदा होत नसल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी)
संक्रांतीनिमित्ताने शहरातील नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यासाठी मनपा आयुक्त जीवन सोनवणे, उपायुक्ता विजया कंठे, स्वच्छता अधिकारी एम.एल. सोनवणे यांनी महानगरपालिकेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या गच्चीवरून पतंग व फुगे उडविले. हा केवळ फार्स ठरला असून प्रत्यक्ष नियोजित कामाची अंमलबजावणी झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया शहरवासीयांकडून उमटत आहे.