मुख्यमंत्री ठाकरे मध्यरात्री विश्वास नांगरे पाटलांना फोन करतात तेव्हा...
By मोरेश्वर येरम | Published: January 3, 2021 07:32 PM2021-01-03T19:32:15+5:302021-01-03T19:52:30+5:30
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री फोन केला होता.
मुंबई
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना ३१ डिसेंबर रोजी मध्यरात्री फोन केला होता. मुख्यमंत्र्यांनी फोन करुन मला या वर्षाची सुरुवात माझ्या पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे, असं सांगितल्याचं विश्वास नांगरे पाटील म्हणाले. खुद्ध नांगरे पाटील यांनी याबाबत खास फेसबुक पोस्ट लिहून याची माहिती दिली आहे.
"मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना नववर्षाच्या शुभेच्छा देणारा संदेश पाठवला. सुखद धक्का देणारा मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. विश्वासराव मला या नवीन वर्षाची सुरुवात माझ्या मुंबई पोलीस दलातील बहाद्दर जवानांसोबत करायची आहे. रात्रभर तुम्ही काम करून थकाल. मी दुपारी एक वाजता येतो", असं मुख्यमंत्री फोनवर म्हणाल्याचं नांगरे पाटील यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या शब्दाप्रमाणे नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुंबईत पोलीस आयुक्तालयात पोलिसांसोबत वेळ व्यतित केला. कोरोना काळात पोलिसांनी केलेल्या कामगिरीबाबत यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस दलाचे आभार व्यक्त केले होते. तसेच राज्याच्या पोलीस दलाचे कर्तृत्व हे सूर्य प्रकाशा इतकं स्वच्छ असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी काढले होते.
'पोलिसांचं कर्तृत्व सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ'; मुख्यमंत्री ठाकरेंनी पोलिसांची पाठ थोपटली
विश्वास नांगरे पाटील यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे पोलीस दलाला नववर्षी बळ मिळाल्याचं म्हटलं आहे. "कोरोनाशी लढा देताना गेले वर्षभर ९८ अधिकारी आणि कर्मचारी शहीद झाले. हजारोजन योद्धया प्रमाणे या आजाराशी झुंजले. कोरोना शहीदांच्या कुटुंबियांना शासनाकडून मिळणारी ५० लक्ष आणि पोलीस आयुक्तांच्या पुढाकाराने मिळणारी १० लक्ष मदत ही पथदर्शी आहे.अशा कर्मचाऱ्यांसाठी राज्याच्या प्रमुखांची अशी दिलासादायक भेट ही मनोबल वाढवणारी ठरली", असं नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.
उमेद वाढवणारी सुरुवात
"आमच्या उत्कृष्ट काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. असाधारण आसूचना पदक प्राप्त पोलीस उपायुक्त गणेश शिंदे आणि एएसआय मुनीर शेख यांचेही कौतुक झाले. एकंदरीत वर्षाची सुरुवात उमेद वाढवणारी ठरली!", असं नांगरे पाटील यांनी आपल्या पोस्टच्या सरतेशेवटी म्हटलं आहे.