जेव्हा काँग्रेस नेत्यांनी थेट इंदिरा गांधींकडे केली होती जवाहरलाल दर्डांची तक्रार...; देवेंद्र फडणवीसांनी सांगितली बाबूजींची आठवण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2024 08:47 PM2024-07-02T20:47:51+5:302024-07-02T20:48:59+5:30
ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले.
मुंबई - "बाबूजींनी नेहमी एक पत्रकार आणि राजकीय पक्षाचे नेते म्हणून आपली भूमिका चोखपणे बजावली. मागे एकदा काही काँग्रस नेत्यांनी थेट इंदिरा गांधी यांच्याकडे बाबूजींची तक्रार केली होती. ते आपल्या पक्षाचे नेते आहेत, पण सगळ्यांच्या बातम्या छापतात, आपल्या विरोधातदेखील छापतात, असे सांगण्यात आले होते. पण, त्यावेळी बाबूजींनी इंदिरा गांधींना स्पष्टपणे सांगितले होते की, पत्रकार म्हणून माझी भूमिका वेगळी आहे. पक्षाचा नेता म्हणून मी माझी भूमिका चोखपणे मांडतो, पण पत्रकार म्हणून जी भूमिका मांडायला पाहिजे, तीदेखील तितक्याच कणखरपणे मांडतो. त्यावेळी इंदिरा गांधी यांनाही त्यांचे हे म्हणणे पटले होते," अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ज्येष्ठ स्वतंत्रता सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापक स्व. जवाहरलाल दर्डा तथा बाबूजी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त 100 रुपयांच्या स्मृती नाण्याचे विमोचन यशवंतराव चव्हाण सभागृहात एका शानदार सोहळ्यात संपन्न झाले. या सोहळ्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे, बाळासाहेब थोरात, मुकुल वासनिक, महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, भाजपा नेते मंगलप्रभात लोढा आदी मान्यवर उपस्थित होते. लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा आणि 'लोकमत'चे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
🕔 5.10pm | 2-7-2024📍 Nariman Point, Mumbai
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 2, 2024
LIVE | Release of a ₹100 commemorative coin in honour of Late Shri Jawaharlal Darda@mieknathshinde@vijayjdarda@RajendrajDarda@lokmat#Maharashtra#Mumbai#CoinRelease#Lokmathttps://t.co/EgPXSiNkZ7
यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीसांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी सांगितले की, "बाबूजींचा आणि माझी फार पूर्वीपासूनची ओळख होती. मी नगरसेवक नंतर महापौर झालो, तेव्हा बाबूजी मला आपुलकीने बोलावून घ्यायचे. लोकमतच्या इमारतीत त्यांची अनेकदा भेट व्हायची, गप्पा व्हायच्या, ते अनेकदा काही सूचनाही करायचे. समोरच्या कुठल्याही व्यक्तीला आपलंस करुन घेण्याची एक विद्या त्यांच्यात होती. काँग्रेसचे नेते असूनही त्यांचे विविध पक्षातील लोकांशी अतिशय जिव्हाळ्याचे आणि घरगुती सबंध होते. त्यांचा हाच गुण विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आणि आता तिसऱ्या पीढीने घेतला आहे. "
"बाबूजींनी राज्याचे मंत्री म्हणून अनेक खात्यांचे काम सांभाळले. उद्योग, आरोग्य पाटबंधारे, क्रीडा..प्रत्येक खात्याचे काम करताना त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. काहीतरी नवीन, चांगले काम केले पाहिजे, असा त्यांचा प्रयत्न असायचा. मुळातच एक स्वातंत्र्यसेनानी असल्याने, त्यांनी नेहमीच काही मूल्ये जपली होती. त्यांनी नेहमी यवतमाळ, नागपूर किंवा संपूर्ण विदर्भासाठी सातत्याने भूमिका मांडल्या. लोकांचा विकास कसा करता येईल, याचा प्रयत्न ते नेहमी करायचे. राज्याच्या सामाजिक राजकीय इतिहासात बाबूजींचे नाव आदराने घेतले जाते. एक पूर्ण व्यक्तिमत्व, अशाप्रकारे आपण त्यांच्याकडे पाहू शकतो," अशा भावना देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केल्या.