मुंबई : दहा वर्षांच्या आतील मुलगा आणून दिल्यास पैसे मिळतील, या आमिषाला भुलून आपल्याच परिचयाच्या चिमुकल्याचे अपहरण करण्याची हिंमत करणाऱ्या एका महाविद्यालयीन तरुणीच्या मित्रासह आणखी एकास पोलिसांनी अटक केली आहे. मित्राच्या मदतीने तिने हा डाव आखला होता. कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपयांत चिमुकल्याची विक्री करण्याचा या दोघांचा डाव होता. मात्र, वडाळा पोलिसांच्या तत्पर कारवाईने हा डाव उधळला गेला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, वडाळा परिसरात राहणाऱ्या सुमन चौरसिया (२७) यांचा तीन वर्षीय मुलगा सोमवारी दुपारी साडेबारा ते अडीचच्या सुमारास घराबाहेर खेळत असताना अचानक गायब झाला. चौरसिया यांनी परिसरात मुलाचा शोध घेतला. मात्र, काहीच थांगपत्ता न लागल्याने त्यांनी पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरू केला. सीसीटीव्हीमध्ये शेजारी राहणाऱ्या सानिका वाघमारेसोबत मुलगा जाताना दिसला.
दोघेही नामांकित कॉलेजचे विद्यार्थी विद्याविहार येथील एका नामंकित कॉलेजमध्ये सानिका आणि पवन हे एफवायबीएससीचे शिक्षण घेत आहेत. सानिकावर कर्ज होते. सार्थकने कल्याणच्या एका कुटुंबाला १० वर्षांच्या आतील मुलगा आणून दिल्यास पैसे देणार असल्याचे पवनला सांगितले. त्यानुसार पवनने सानिकाला दोन लाखांचे आमिष दाखवून या कटात सहभागी करून घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
असा सापडला चिमुकला
वडाळा पोलीस ठाण्याच्या प्रभारी वरिष्ठ पोलिस निरीक्षक उषा बाबर, पोलिस निरीक्षक विकास म्हामुणकर (गुन्हे), पोलिस उपनिरीक्षक शरद खाटमोडे, आदित्य सस्ते आणि अंमलदार हे चिमुकल्याचा तपास करत असताना शकील शेख (१९ ) व साईनाथ कांबळे (२४) हे हरवलेल्या मुलाला घेऊन पोलिस ठाण्यात आले. सानिकाने या दोघांना चिमुकल्याचा ताबा देताना हा वाटेत सापडल्याची बतावणी करत चिमुकल्याला वडाळा पोलिसांच्या ताब्यात देण्यास सांगितले. सानिकाची चौकशी केली असता तिच्या ओळखीचा पवन पोखरकर (२०) याने तिला दोन लाख रुपयांसाठी १० वर्षापर्यंतचा मुलगा आणण्यास सांगितल्याचे तिने स्पष्ट केले. तो मुलाच्या बदल्यात तिला दोन लाख रुपये देणार होता. त्यानुसार, मुलाची विक्री करण्यासाठी ती पवनसोबत मुलाला घेऊन टॅक्सीने कल्याण येथे गेली. मात्र, तिथे संबंधित व्यक्तींशी संपर्क न झाल्याने डाव फसल्याची कबुली सानिकाने दिली. कटात सहभागी असलेल्या पवन आणि सार्थक बोंबले यांना पोलिसांनी मंगळवारी सकाळी अटक केली. पोलिस अधिक तपास करत आहेत.