Join us

बारावीच्या परीक्षांचा निर्णय कधी ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 4:05 AM

विद्यार्थी, पालक, शिक्षकांपुढे प्रश्नचिन्ह; सीबीएसईच्या निर्णयानंतरच अंतिम निर्णय हाेण्याची शक्यतालोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण ...

विद्यार्थी, पालक, शिक्षकांपुढे प्रश्नचिन्ह; सीबीएसईच्या निर्णयानंतरच अंतिम निर्णय हाेण्याची शक्यता

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शालेय शिक्षण विभागाने बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. मात्र, त्या कधी होणार, हे जाहीर करण्यात आले नसल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रम आहे. काेरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेऊन केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेणार आहे. मात्र, आता त्या रद्द करण्याबाबत विचार सुरू असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतल्यानंतर शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळ आपला निर्णय जाहीर करेल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बारावीनंतरच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बारावीचे गुण आणि प्रवेशपरीक्षेचे गुण दोन्ही महत्त्वाचे असतात. त्यामुळे बारावीची परीक्षा होणे गरजेचे आहे, अशी आग्रही मागणी तज्ज्ञांकडून होत आहे. मात्र, राज्य सरकार असो किंवा शिक्षण मंडळ, यातील काेणाकडूनही बारावीची परीक्षा होणार की नाही, होणार असेल तर ती कशा पद्धतीने होणार, कधी होणार, याबाबत अद्याप काहीही माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांचा ताण दिवसेंदिवस वाढत आहे. बारावीच्या परीक्षेबाबत शिक्षणाधिकाऱ्यांकडे वारंवार विचारणा केली जात असतानाही कोणतेही सकारात्मक उत्तर मिळत नसल्याची माहिती पालक संघटनांनी दिली.

* विद्यार्थ्यांना तयारीसाठी हवा किमान ३० दिवसांचा कालावधी

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा जवळपास १४ लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तरीही काेराेनाच्या पार्श्वभूमीवर जूनमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेबाबत अनिश्चितता कायम आहे. मे महिन्यात होणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक तणावात आहेत. परीक्षांसाठी शेवटच्या टप्प्यात तयारी करण्यासाठी विद्यार्थ्यांना परीक्षेपूर्वी किमान १५ ते ३० दिवसांचा कालावधी आवश्यक आहे. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय लवकरात लवकर जाहीर करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांसह पालकांकडून होत आहे.

* तूर्तास ‘वेट अँड वॉच’चे धोरण

शालेय शिक्षण विभाग आणि राज्य मंडळामध्ये बारावीच्या परीक्षांबाबत सध्या चर्चा सुरू आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. सीबीएसईने बारावीच्या परीक्षेबाबत निर्णय जाहीर केल्यानंतर, शालेय शिक्षण विभागाकडून बारावीच्या परीक्षांबाबत ठोस निर्णय अपेक्षित आहे. तोपर्यंत त्यांचे ‘वेट अँड वॉच’चे धोरण असल्याचे समजते.

..........................................................