मुंबई : म्हाडाकडे अर्ज केलेल्या सुमारे १ लाख ४२ हजार गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरे कधी देणार, असा थेट सवाल गिरणी कामगार एकजूट संघटनेने राज्य सरकारला केला आहे.सद्य:स्थितीमध्ये गिरण्यांच्या जागेवर केवळ २ हजार ६१० घरांचे बांधकाम सुरू आहे. या घरांकरिता गिरणी कामगार आणि वारसांना आघाडी सरकारने ठरविल्याप्रमाणे घरांच्या किमतीसाठी १८ ते २० लाख मोजावे लागणार आहेत. मात्र त्यांना घरांच्या या किमती परवडणाऱ्या नाहीत. परिणामी सरकारच्या धोरणाने सर्वस्व गमावलेल्या गिरणी कामगारांच्या घरांची किंमत या धोरणांचे लाभार्थी ठरलेल्या गिरणी मालकांसह विकासकाकडून वसूल करण्यात यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. महत्त्वाचे म्हणजे आघाडी सरकारच्या कारकिर्दीत भाजपा-शिवसेनेने गिरणी कामगारांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला होता. मात्र सत्तेवर आल्यानंतर दोन्ही पक्षांना पाठिंब्याचा विसर पडल्याची खंत संघटनेने व्यक्त केली आहे. परिणामी सत्ताधारी वर्गाला पाठिंब्याची आठवण करून देण्यासाठी संघटनेच्या वतीने मेळावा घेण्यात येणार आहे. ४ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता प्रभादेवी येथील भूपेश गुप्ता भवन येथे गिरणी कामगार व वारसांचा मेळावा भरणार आहे. या मेळाव्यात आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)
गिरणी कामगारांसह वारसांना घरे कधी?
By admin | Published: June 30, 2015 1:35 AM