Join us

राज्याच्या राजकीय वर्तुळात केंद्रस्थानी असलेल्या 'भोंग्या'चा जन्म कधी झाला?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2022 4:23 AM

भोंग्याच्या मर्यादा अन् क्षमता वाढीस अनेक दिग्गज शास्त्रज्ञांचे योगदान लाभलेले आहे

मनोज गडनीस, विशेष प्रतिनिधी

एकेकाळी दूरवर आळवले जाणारे शहनाईचे सुमधुर प्रसन्न सूर आपल्यापर्यंत पोहोचविणाऱ्या भोंग्यातून सध्या कर्कश राजकीय राग आळवले जात आहेत. विचारांत दडलेली कर्कशता आपल्या कानापर्यंत पोहोचविणारे भोंगे हे त्यामुळेच सध्या चर्चेचा विषय झाले आहेत. पण हे भोंगे आले कुठून, त्याचाच हा शाेध!

भोंग्याद्वारे प्रसारित होणाऱ्या आवाजाला दोन परिमाणे आहेत. एक फ्रिक्वेन्सी आणि दुसरे डेसिबल. आवाजाची गुणवत्ता ही फ्रिक्वेन्सीवर मोजली जाते. मानवी कानाची क्षमता २० ते २०,००० हर्टझ् ऐकण्याची आहे. एका सेकंदात ध्वनीची किती आवर्तने होतात त्याची मोजणी ‘हर्टझ्’वर होते. आवाजाचे प्रेशर मोजण्याचे परिमाण म्हणजे डेसिबल. मानवी अवयव अत्यंत संवेदनशील असतात. १२० डेसिबल क्षमतेचा आवाज मानवी कान कायमस्वरूपी जायबंदी करायला पुरेसा आहे. उदाहरणाने सांगायचे तर, लहान बाळ जेव्हा रडते तेव्हा तो आवाज २४० ते ३०० डेसिबलपर्यंत जातो किंवा एखादी व्यक्ती किंचाळली तर तो आवाज ३०० डेसिबलच्या पुढे जातो. त्यामुळे त्या आवाजाने वैतागाची भावना तयार होते. बाजारात आज १०० वॉटस् ते पाच हजार वॉटस् क्षमतेचे भोंगे उपलब्ध आहेत. किमान ते कमाल क्षमतेचे भोंगे कर्णबधिरता आणण्यास पुरेसे आहेत. 

भोग्यांचा जन्म कधी झाला ?भोंग्याची जन्मकथा गुंतागुंतीची आहे. भोंग्याच्या मर्यादा अन् क्षमता वाढीस अनेक दिग्गज शास्त्रज्ञांचे योगदान लाभलेले आहे. आज कर्कश वाटणाऱ्या भोंग्याचा जन्म झाला सन १८६१ मध्ये. फोनमधील आवाज मोठा आणि सुस्पष्ट ऐकू यावा या मर्यादित हेतूने संशोधक जॉन फिलिप्स यांनी हा पहिला छोटेखानी स्पीकर तयार केला. परंतु, त्यांचा हा प्रयोग तसा फसलाच, कारण कधी आवाज सुस्पष्ट यायचा तर कधी मोठा. दोन्ही एकाच वेळी साधणे त्यांना शक्य झाले नाही. 

स्वरूप कसे बदलत गेले?फिलिप्स यांचा शोध फसला तरी, हा एक क्रांतिकारी प्रयोग असल्याचे लक्षात घेत टेलिफोनचा शोध लावणारे शास्त्रज्ञ अलेक्झांडर ग्रॅहम बेल यांना १८७६ मध्ये लाऊडस्पीकरची संकल्पना साकारणे शक्य झाले आणि लगोलग त्यांनी त्याचे पेटंटही घेतले. बेल यांनी बनविलेल्या लाऊडस्पीकरने अनेकांचे कान टवकारले. आवाजाच्या वाढत्या आवर्तनातील शक्ती ओळखून मग १८७७ मध्ये व्हर्नर सीमन्स यांनी बेल यांचे डिझाइन घेत त्याची क्षमता वाढविण्यासाठी त्यात कॉईल तंत्राचा वापर केला. मात्र, त्यांना त्यात फारसे यश आले नाही. सीमन्स यांचे हे संशोधन सुरू असताना समांतर पातळीवर १८७७ मध्ये, दिव्याचा शोध लावणारे थॉमस एडिसन हेदेखील या तंत्रावर काम करत होते. हवेला आकुंचित करत त्यातून ध्वनिलहरी फेकण्यास वेग येईल आणि असे होताना त्याच्या आवाजाचे गुणोत्तर किमान पाच पट वाढेल, अशा पद्धतीने त्यांनी स्पीकर तयार केला. त्याला उत्तम प्रतिसाद लाभू लागला. 

१८९८ मध्ये हॉरिस शॉर्ट यांनी आणखी संशोधन करत आवाजाची मर्यादा वाढेल असा स्पीकर जन्माला घातला.  भोंग्याचे आत्ताचे जे रूप आहे ते आकारास आले १९२५ मध्ये. चेस्टर राईस यांनी याची निर्मिती केली आणि तेव्हापासून या भोंग्याद्वारे अनेकांनी आपल्या सभा गाजवल्या आहेत. १८९८मध्ये स्पीकरचा वापर हा चित्रपटगृहातून होण्यास सुरुवात झाली. या तंत्राविष्कारामुळे सिनेमाचे जगच बदलून गेले.