Join us

फेसबुकच्या भिंतीवर जेव्हा लिहिली जाते दिल की बात;राजेंद्र दर्डा यांचे मनोगत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2020 2:18 AM

लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या फेसबुकवरील भिंतीचं अंतरंग आज राजभवनात मान्यवरांच्या साक्षीने उलगडून दाखवलं.

एक जमाना वह भी था जब दीवारों पर लिखते थे इन्कलाब एक जमाना यह भी है,दीवारों पर होती है दिल की बात ... 

असं जाहीर करत लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी त्यांच्या फेसबुकवरील भिंतीचं अंतरंग आज राजभवनात मान्यवरांच्या साक्षीने उलगडून दाखवलं. ‘माझी भिंत’ या अनोख्या पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने हा योग जुळून आला. एरवी द्वेष, दुरावा आणि आकसाला कारण ठरणाऱ्या समाजमाध्यमाचा उपयोग मनं जोडण्यासाठी, हरवलेले दुवे सांधण्यासाठी आणि आयुष्याच्या वाटचालीत जमवलेलं संचित वाटण्यासाठी केला तर याच भिंतीवर स्नेहाचे किती सुंदर मळे फुलवता येतात; याचा अनुभव मी यानिमित्ताने घेतला, असं दर्डा यांनी याप्रसंगी आवर्जून नमूद केलं. या पुस्तकातील काही स्वरचित कवितांच्या संवेदनशील ओळी त्यांनी वाचून दाखविल्या तेव्हा टाळ्यांचा कडकडाट झाला.  

चार दशकांहून अधिक काळ लोकमतसारख्या मुख्य माध्यम प्रवाहातील अग्रणी वृत्तपत्राचं सारथ्य करत असताना चार वर्षांपूर्वी केवळ नवं जग समजून घेण्याच्या उत्सुकतेपायी ऑनलाईन कट्ट्यावर  आलेले राजेंद्र दर्डा यांनी अल्पावधीतच फेसबुकवर अक्षरश: हजारो चाहत्यांचं कुटुंब जोडलं. या कुटुंबाशी झालेल्या गुजगोष्टींना जुन्या आठवणींची अस्तरं आहेत आणि समकालीन घटनांवरच्या मतप्रदर्शनाचे टाकेही आहेत 

प्रदीर्घ राजकीय कारकीर्द आणि सामाजिक जीवन लाभलेले दर्डा यानी आपल्या समृद्ध अनुभवविश्वाची दारं या पुस्तकाच्या निमित्ताने उघडली आहेत. कोरोना महामारीमुळे सगळं जग घरात कोंडलं गेलेलं असताना राजेंद्र दर्डा यांनी फेसबुकवर पोस्ट केलेल्या एका कवितेने अनेकांच्या मनावरचं निराशेचं मळभ दूर केलं होतं. ते लिहितात,सगळं थांबलं आहे, संपलेलं नाही,माणूस हताश आहे, हरलेला नाही !आपण धावत होतो, ठेच तेवढी लागली आहे,चला, रक्ताळलेला अंगठा बांधून घ्या,उद्याची सकाळ आपलीच आहे! 

टॅग्स :राजेंद्र दर्डालोकमत