‘रंगसंगती’ला जेव्हा खुणावतात रुग्णालयाचे दरवाजे...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:06 AM2021-05-19T04:06:13+5:302021-05-19T04:06:13+5:30

राज चिंचणकर लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नाट्यक्षेत्रावर पडदा पडला असल्याने, नाट्यगृहे, पर्यायाने रंगमंच ओस पडले ...

When the doors of the hospital mark 'Rangsangati' ...! | ‘रंगसंगती’ला जेव्हा खुणावतात रुग्णालयाचे दरवाजे...!

‘रंगसंगती’ला जेव्हा खुणावतात रुग्णालयाचे दरवाजे...!

Next

राज चिंचणकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या काळात नाट्यक्षेत्रावर पडदा पडला असल्याने, नाट्यगृहे, पर्यायाने रंगमंच ओस पडले आहेत. नाट्यगृहांचे दरवाजे बंद असले, तरी कलाक्षेत्रातील संवेदनशील मंडळी स्वस्थ राहू शकत नाहीत. अशा वेळी कलाक्षेत्रातील काही जणांना रंगमंचाच्या ऐवजी रुग्णालयाचे दरवाजे खुणावू लागले आणि त्यांनी थेट रक्तदानाच्या माध्यमातून, सामाजिक बांधिलकीचा ‘प्रवेश’ सादर करत अनोखे उदाहरण कायम केले.

कलाक्षेत्रात कार्यरत असलेल्या रंगसंगती कलामंच या संस्थेचा यंदा ११वा वर्धापन दिन होता. गेली दहा वर्षे या मंडळींनी संस्थेचा वर्धापन दिन रंगमंचांवर विविध कलागुणांच्या माध्यमातून साजरा केला. मात्र, यंदा कोरोनाच्या काळात रंगमंचाचे दरवाजे बंद असताना, २४ तास उघडे असणारे रुग्णालयाचे दरवाजे या संस्थेला समाजकार्यासाठी खुणावत होते. त्या पार्श्वभूमीवर या संस्थेने १६ मे रोजी टाटा मेमोरिअल हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करून वेगळा पायंडा पाडला.

महत्त्वाचे म्हणजे, या रक्तदान शिबिरात रंगसंगतीच्या सर्व सभासदांनीही रक्तदान केले. त्याशिवाय, केवळ मुंबईतूनच नव्हे, तर पनवेल, टिटवाळा, विरार आदी ठिकाणांहून आलेल्या नागरिकांनी या शिबिरात रक्तदान केले. विशेष म्हणजे, याच दिवशी वयाची १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या नुपूर राणे या युवतीने रक्तदान करून तिचा वाढदिवस साजरा केला, तसेच गेली अनेक वर्षे नियमित रक्तदान करत आलेल्या ६२ वर्षीय विद्याधर सावंत यांनीही येथे रक्तदान केले.

युवा अभिनेता अनुराग वरळीकर यानेही यावेळी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रंगसंगतीचे हे शिबिर शासनाने आखून दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत पार पडले. सध्याचा काळ पाहता, एकूण ६२ जणांनी या रक्तदान शिबिरात सहभाग नोंदविला. त्यातील ५४ जण रक्तदान करण्यास पात्र ठरले. सध्याच्या कठीण परिस्थितीत मिळालेला हा प्रतिसाद पाहून आणि संस्थेने घेतलेला पुढाकार लक्षात घेऊन टाटा मेमोरिअल हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनीही रंगसंगती कलामंचचे कौतुक केले.

* अभिमानास्पद गोष्ट

कलेसोबतच समाजकार्याचीही ओढ सध्याच्या युवापिढीला असल्याची प्रचिती या शिबिरातून आली. आमच्यासाठी ही अभिमानास्पद गोष्ट आहे. सर्वांच्या सहभागाने हे शिबिर यशस्वी झाले, याचे समाधान आहे.

- रोहित खुडे, अध्यक्ष, रंगसंगती कलामंच

--------------------------------------------------------------------------------------------------------------

Web Title: When the doors of the hospital mark 'Rangsangati' ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.