Join us

‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये नेमके कधी मिळणार? अजित पवारांची विधानसभेत महत्त्वाची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 09:26 IST

Deputy CM Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनावर अजित पवार यांनी महत्त्वाचे स्पष्टीकरण दिले आहे.

Deputy CM Ajit Pawar On Ladki Bahin Yojana: २०२४ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत गेमचेंजर ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झाल्यापासूनच चर्चेचा विषय ठरलेली आहे. विरोधक सातत्याने या योजनेवर टीका करत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने पुन्हा सरकार स्थापन झाल्यास लाडकी बहीण योजनेत २१०० रुपये देण्याचे आश्वासन दिले. परंतु, याची पूर्तता कधी होईल, याची निश्चित शाश्वती नसल्याचे म्हटले जात आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. २१०० रुपये नेमके कधीपासून मिळणार, असा सवाल केला जात आहे. यात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत विधानसभेत महत्त्वाची माहिती दिली. 

नमो शेतकरी व लाडकी बहीण या दोन्ही शासकीय योजनांचा लाभ सव्वाआठ लाख महिलांनी घेतल्याची माहिती व तंत्रज्ञान विभागाने केलेल्या तपासात उघड झाली आहे. या महिलांना लाडकी बहीण योजनेत वार्षिक १८ हजार रुपयांऐवजी सहा हजार रुपयेच मिळण्याची शक्यता आहे. नमो शेतकरी योजनेअंतर्गत राज्य सरकारचे सहा हजार रुपये आणि केंद्र सरकारचे सहा हजार रुपये असे १२ हजार रुपये वर्षाकाठी दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा नियम असा आहे की, या महिलांना  शासकीय योजनांतून वर्षाकाठी १८ हजार रुपयांपेक्षा अधिक पैसा दिला जाणार नाही. माहिती व तंत्रज्ञान विभागाने या दोन्ही योजनांचा लाभ एकाचवेळी घेतलेल्या महिलांची नावे महिला व  बालकल्याण विभागाला कळविली असल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे. यातच अजित पवार यांनी विधानसभेत लाडकी बहीण योजनेचे २१०० रुपये कधीपासून देण्यात येणार, याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. 

‘लाडक्या बहिणीं’ना २१०० रुपये नेमके कधी मिळणार?

सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग आणता येत नाही. त्यामुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतरच माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना वाढीव मदत देण्यात येईल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत दिले. या खुलाशामुळे योजनेतील पात्र लाडक्या बहिणींना २१०० रुपयांच्या मदतीसाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागणार आहे. अर्थसंकल्पातील वित्त, नियोजन, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या अनुदानाच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांना २१०० रुपयांची मदत कधी करणार, अशी विचारणा सदस्यांनी केली होती. त्यावर सध्या लाडक्या बहिणींना १५०० रुपयांची मदत देत आहोत. आर्थिक परिस्थिती सुधारल्यावरच वाढीव मदत दिली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, आता सव्वाआठ लाख महिला नमो शेतकरी योजनेत वर्षभरात १२ हजार रुपये मिळवितात आणि त्याच महिला लाडकी बहीण योजनेतून देखील १८ हजार रुपये वर्षाकाठी मिळवतात, म्हणजे त्यांना वर्षाकाठी एकूण ३० हजार रुपये मिळतात हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या महिलांचा लाभ कमी करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. नमो शेतकरी योजनेतील १२ हजार रुपये त्यांना मिळत राहावेत व लाडकी बहीण योजनेतून वर्षाकाठी सहा हजार रुपये द्यावेत म्हणजे त्यांना शासकीय नियमानुसार वर्षाकाठी १८ हजार रुपये मिळतील असा नवा प्रस्ताव आता समोर आला आहे. या सव्वाआठ लाख महिलांना पुढेही हा लाभ चालू ठेवायचा तर सरकारला त्यासाठी आधीच्या निर्णयात बदल करावा लागेल. मात्र डबल लाभ द्यायचा नाही असे ठरविले तर वार्षिक १४०० कोटींचा अतिरिक्त बोजा कमी होईल. या दोन्ही योजनांत २,२०० सरकारी क आणि ड वर्ग कर्मचाऱ्यांनी लाभ घेतल्याचेही आढळले आहे. यातील १,२०० कर्मचारी हे विविध जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत आहेत. दर महिन्याला पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांनी लाभ कसा उचलला हा प्रश्न उपस्थित झाला आहे. 

 

टॅग्स :लाडकी बहीण योजनाअजित पवारविधानसभाविधान भवनराज्य सरकारमहायुती