आफ्रिकेत जाताय, यलो फिवरची लस घेतली का? प्रवासाच्या आधी १५ ते २० दिवस घेणे गरजेचे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 02:12 PM2023-08-25T14:12:42+5:302023-08-25T14:13:00+5:30
किती रुपयाला आणि कोठे मिळते लस? जाणून घ्या
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आपल्याकडे अनेक वेळा आफ्रिकन देशात फिरण्यासाठी, तेथील जंगलाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणत पर्यटक त्या ठिकाणी जात असतात. तेथील टायगर सफारी हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. या आफ्रिकन देशात जाणाऱ्यांना केंद्र सरकारने पिवळ्या तापाची (यलो फिवरची) प्रतिबंधात्मक लस घेणे बंधनकारक केले आहे. तुम्ही ती घेतली आहे याचा पुरावा म्हणून लसीकरण झाल्याचे प्रमाणपत्र दाखविणे गरजेचे आहे. त्याशिवाय तुम्हाला प्रवेश दिला जात नाही. प्रवास करण्याच्या आधी १५ ते २० दिवस ही लस घेणे महत्त्वाचे आहे. या आफ्रिकन देशात पिवळा तापाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे त्या देशात गेल्यावर हा आजार होण्याची शक्यता असते. आपल्याकडे या आजाराच्या विरोधात लस तयार करण्यात आली आहे.
अनेक नागरिक भारतातून या देशात जाताना ही लस टोचून घेतात आणि मग त्या देशात जातात. तो आजार होऊ नये म्हणून हा प्रतिबंधात्मक उपाय आहे. यामुळे लस घेणाऱ्या नागरिकांना हा आजार होत नाही. यामुळे वेळेत लस घेणे गरजेचे आहे.
किती रुपयाला आणि कोठे मिळते लस?
मुंबईत एअरपोर्ट, सिपोर्ट, जे जे रुग्णालय, के ई एम रुग्णालय आणि खेतवाडी येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ फॅमिली वेल्फेअरच्या कार्यालयात ही लस उपलब्ध आहे. या ठिकाणी ही लस ३०० रुपयांना मिळते. त्याकरिता तुमचा पासपोर्ट आवश्यक असतो.
तुटवडा का?
- या लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा आढळून येतो. अनेक पर्यटक ही लस मिळवी म्हणून एका सेंटरवरून दुसऱ्या सेंटरवर पळत असतात.
- अनेक रुग्णालयात ही लस अनेक वेळा उपलब्ध नसते. मात्र, एअरपोर्टवर ती मिळते. त्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागते.
- लस तुटवड्याचे कारण म्हणजे या लसीचा पुरवठा केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाकडून होत असतो. त्यांनी साठा उपलब्ध केल्यावरच पुढे ती नागरिकांना देण्यात येते. सुटीच्या हंगामात या लसीला मोठ्या प्रमाणत मागणी असते.
आफ्रिकन देशात पिवळ्या तापाचे रुग्ण आढळतात. त्यामुळे त्या देशात जाताना लस घेतल्यास तो आजार होत नाही. कारण आपल्या देशात हा आजार नाही. हा आजार डासांच्या चाव्यामुळे होत असतो. जर लसीकरण केले नसेल तर तो डास त्या नागरिकाला त्या ठिकणी चावला तर त्याला आजार होईल. मात्र, परत भारतात परतल्यावर येथे पसरू शकतो. त्यामुळे पिवळ्या तापाची लस बंधनकारक आहे आणि हा एकमेव ठोस प्रतिबंधात्मक उपाय आहे.
-डॉ. ऋजुता हाडये, प्राध्यापक आणि विभागप्रमुख, नायर रुग्णालय