मुंबई : शहरात अनेक ठिकाणी लहान मुले भीक मागत असल्याचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. मात्र, ही लहान मुले नक्की कोणत्या भागातली आहेत, ती त्याच शहरातली किंवा परिसरातील आहेत की बाहेरून आलेली आहेत, यासंदर्भात अनेकांना माहिती नसते. हल्लीच औरंगाबाद येथे भीक मागण्यासाठी लहान मुलांची खरेदी झाली असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे शहरात ट्रॅफिक सिग्नलवर, रेल्वेस्थानकांवर किंवा पर्यटन स्थळांवर आढळून येणारी भीक मागणारी लहान मुले एखाद्याच्या दबावाखाली किंवा कोणत्या षडयंत्राला बळी पडलेली तर नाहीत ना, असा संशय व्यक्त केला जात आहे.
मुंबईत वाढत आहे भिकाऱ्यांचे प्रमाण
* चेंबूरच्या अमर महल जंक्शन येथे भिकाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात वास्तव्य आढळून येते. या ठिकाणी असणाऱ्या उड्डाणपुलांच्या खाली १०० हून अधिक भिकारी आहेत. यामध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. या लहान मुलांच्या अंगावर अनेकदा कपडेही नसल्याचे दिसून येते, तसेच येथे असणाऱ्या भिकाऱ्यांच्या हातात भीक मागताना एक ते चार वर्षांचे लहान मूल असते व ते कायम झोपलेल्या अवस्थेत असते. त्यामुळे या मुलांना गुंगीचे औषध तर दिले जात नाही ना असा संशय व्यक्त करण्यात येतो.
* दादर व माटुंगा परिसरातदेखील भिकाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. येथे ट्रॅफिक सिग्नलवर लहान मुले भीक मागताना आढळून येतात. हे सर्व भिकारी दादरच्या उड्डाणपुलाखाली किंवा माटुंग्याच्या मेजर दडकर मैदानाच्या बाहेर अनधिकृतपणे वास्तव्य करताना दिसून येतात. यामुळे येथे अस्वच्छतेचे प्रमाण वाढत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या तोंडाला कधीच मास्क दिसून येत नसल्याने संसर्गाची भीतीदेखील व्यक्त करण्यात येते.
बालहक्क कोण मिळवून देणार?
साईनाथ कदम (सामाजिक कार्यकर्ते) - शहरांमध्ये भीक मागणारी लहान मुले ही कोणाच्या तरी दबावाखाली भीक मागत असतात. संबंधित प्रशासनाने अशा लहान मुलांना बालसुधारगृहामध्ये टाकून त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करायला हवी. अनेकदा ही लहान मुले बालपणातच नशेच्या आहारी जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे हीच मुले पुढे जाऊन गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात. लहान वयातच या मुलांना भीक मागण्यापासून रोखून त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे.