'ओबीसींचं नेतृत्व संपवणाऱ्या भाजपला OBC चा कळवळा कधीपासून?'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2021 02:37 PM2021-06-24T14:37:13+5:302021-06-24T14:38:49+5:30
फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाबाबत संताप व्यक्त केल्यानंतर रोहिणी खडसेंनी भाजपला सवाल केला आहे.
मुंबई - मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. सरकार केवळ घोषणा करत राहिले, प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशी टीका भाजपाकडून करण्यात आली आहे. तर, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. त्यानंतर, राष्ट्रवादीच्या नेत्या आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसेंनी भाजपवर टीका केली आहे.
ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होण्यास ठाकरे सरकारच जबाबदार असल्याची टीका भाजपा नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यावरून, देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. ओबीसी समाजाचा विश्वासघात राज्य सरकारकडून होत आहे, असे म्हणत भाजपाकडून तीव्र आंदोलनाचा इशाराच देण्यात आला आहे. एकतर राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण संपले. मंत्री म्हणतात, हे आरक्षण पुनर्स्थापित होत नाही, तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत आणि दुसर्याच दिवशी निवडणुका जाहीर होतात, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले. फडणवीस यांनी ओबीसींच्या आरक्षणाबाबत संताप व्यक्त केल्यानंतर रोहिणी खडसेंनी भाजपला सवाल केला आहे.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. आता गळा काढण्यात अर्थ नाही, असे ट्विट रोहिणी खडसेंनी केलं आहे. रोहणी खडसेंनी भाजपसह फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावला आहे.
भाजपाला ओबीसींचा कळवळा कधीपासून यायला लागला ? ओबीसी नेत्यांचे नेतृत्व संपविताना हा कळवळा कुठे गेला होता?. .. आता गळा काढण्यात अर्थ नाही.
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) June 24, 2021
केशव उपाध्ये यांचाही सरकावर निशाणा
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यातील आघाडी सरकारच्या अपयशामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाले. ज्या जिल्हा परिषदांची केस होती तेथे आता पोटनिवडणूका लागल्या. विजय वडेट्टीवार आणि छगन भुजबळ नुसतेच घोषणा करत राहिले. प्रत्यक्षात ओबीसींचे नुकसान झाले, अशी टीका केशव उपाध्ये यांनी केली आहे.
जिल्हा परिषदांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर
सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि नागपूर या जिल्ह्यातील ओबीसीचे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमधील राजकीय आरक्षण रद्द करण्यात आले होते. रद्द करण्यात आलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदांच्या रिक्त जागांवर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे.
किती जागांवर आणि कधी होणार निवडणूक?
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, धुळे, नंदुरबार, अकोला, वाशीम व नागपूर या ५ जिल्हा परिषद, तसेच त्यांतर्गतच्या ३३ पंचायत समित्यांमधील रिक्त झालेल्या पदांच्या पोटनिवडणुकीसाठी १९ जुलै २०२१ रोजी मतदान होणार आहे. तर २० जुलै २०२१ रोजी मतमोजणी होईल. तसेच धुळ्यात १५, नंदूरबारमध्ये ११,अकोल्यात १४, वाशिममध्ये १४ आणि नागपूरमध्ये १६ जिल्हापरिषद विभागात निवडणुका होणार आहेत. तर, धुळ्यात ३०, नंदूरबारमध्ये १४, अकोल्यात २८, वाशिममध्ये २७ आणि नागपूरमध्ये ३१ पंचायत समितीत निवडणुका होणार आहेत.