पहिलीकरिता वय वर्षे सहाची अट कधी? वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 10:44 AM2024-03-11T10:44:23+5:302024-03-11T10:46:00+5:30

इयत्ता पहिलीत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी केंद्र सरकारने किमान सहा वर्षे पूर्ण वयाची अट घातली आहे.

when is the age requirement of six years for the first standard thats why school is in confusion as the age gap is not resolved in mumbai | पहिलीकरिता वय वर्षे सहाची अट कधी? वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात

पहिलीकरिता वय वर्षे सहाची अट कधी? वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात

मुंबई : इयत्ता पहिलीत २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी केंद्र सरकारने किमान सहा वर्षे पूर्ण वयाची अट घातली आहे. राज्यांनीही त्यानुसार बदल करण्याची सूचना करण्यात आली आहे. मात्र, राज्याच्या शालेय शिक्षण विभागाकडून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.  दुसरीकडे अनेक शाळांची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. परंतु, वयाचा घोळ न सुटल्याने शाळा संभ्रमात आहेत.

‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणा’त वय वर्षे सहा पूर्ण केलेल्या मुलांनाच पहिलीला प्रवेश देण्यात यावा, असे सूचित करण्यात आले आहे. मात्र, अनेक राज्यांमध्ये सहापेक्षा कमी वयाच्या मुलांना पहिलीला प्रवेश दिला जातो. केंद्र सरकारने १५ फेब्रुवारीला सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र पाठवून २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीमध्ये सहा वर्षे पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जावा, असे निर्देश दिले आहेत.  मात्र, शाळांचा याला विरोध आहे.

तोडगा काय? 

नर्सरीपासून सुधारित वयाची अट लागू केली तर गोंधळ होणार नाही. नवीन नियमानुसार वयाची तीन वर्षे पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना नर्सरीत प्रवेश दिला तर वरच्या वर्गातील प्रवेशाचे घडी विस्कटणार नाही, असे मत दक्षिण मुंबईतील एका मुख्याध्यापिकेने व्यक्त केले.

शाळांसमोरील अडचणी -

१)  महाराष्ट्रात अनेक शाळांमध्ये अजूनही वय वर्षे पाच पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाही पहिलीत प्रवेश दिला जातो. 

२)  यंदापासून या निर्णयाची अंमलबजावणी केल्यास सध्या पहिलीत असलेल्या मुलांना पुन्हा एकदा पहिलीत बसावे लागेल. 

३)  केवळ पहिलीच नव्हे तर नर्सरी, ज्युनिअर आणि सिनिअर केजीच्या विद्यार्थ्यांनाही त्याच वर्गात बसवावे लागेल. 

४)  वरचे वर्ग रिकामे राहतील ते वेगळे. फी देखील पुन्हा भरावी लागणार असल्याने याला पालकांकडून विरोध होणार आहे. 

Web Title: when is the age requirement of six years for the first standard thats why school is in confusion as the age gap is not resolved in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.