पोलिसांच्या बदल्या, बढत्यांना मुहूर्त कधी?

By मनीषा म्हात्रे | Published: July 29, 2024 10:28 AM2024-07-29T10:28:23+5:302024-07-29T10:28:49+5:30

शिपायापासून सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी बदली व बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.

when is the time for police transfers and promotions | पोलिसांच्या बदल्या, बढत्यांना मुहूर्त कधी?

पोलिसांच्या बदल्या, बढत्यांना मुहूर्त कधी?

मनीषा म्हात्रे, वरिष्ठ प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या वर्षाच्या सुरुवातीला काही अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि बढत्यांचे सोपस्कार पार पडले, पण एप्रिल-मे दरम्यान होणाऱ्या पोलिसांच्या सर्वसाधारण बदल्या आणि बढत्यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जुलै महिना संपत आला, तरी शिपायापासून सहायक पोलिस आयुक्त दर्जाचे अधिकारी बदली व बढतीच्या प्रतीक्षेत आहेत.

निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, जानेवारीत मुंबई पोलिस दलातील काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. त्यात तीन एसीपी, ११ वरिष्ठ पोलिस निरीक्षक, २७ पोलिस निरीक्षक, २६ सहायक पोलिस निरीक्षक तर ११८ पोलिस उपनिरीक्षकांचा समावेश आहे. २३ पोलिस निरीक्षकांना वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हणून बढती देऊन बदल्या करण्यात आल्या. मुलांच्या शाळा, वास्तव्याचे ठिकाण तसेच इतर बाबींची तजवीज करायला वेळ मिळावा यासाठी पोलिसांच्या बदल्या, बढत्या दरवर्षी पावसाळ्यापूर्वी केल्या जातात. यावर्षी जुलै महिना संपत आला तरी अद्याप आदेश निघालेले नाही. 

गृहमंत्रालय, महासंचालक कार्यालय आणि आयुक्त कार्यालयातून बदल्या, बढत्या का रखडल्या, याची नेमकी कारणे समजत नसल्याने पोलिसांमध्ये नाराजीचा सूर आहे.

यामध्ये शिपाई ते सहायक पोलिस उपनिरीक्षक, उपनिरीक्षक ते पोलिस निरीक्षक आणि सहायक पोलिस आयुक्तपदापर्यंतच्या बढत्या, बदल्या खोळंबल्या आहेत. दुसरीकडे, काही जण ‘एसीपी’च्या बढतीसाठी ग्राह्य असूनही बढती नाकारत अनेकांचा वरिष्ठ पोलिस निरीक्षकाची ‘खुर्ची’ टिकविण्याचा खटाटोप सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.

काही महिन्यांपूर्वी १८९ पोलिस निरीक्षक या बढतीसाठी ग्राह्य होते. मात्र, कागदोपत्री विभागीय चौकशीचा शेरा दिसत असल्याने त्यांना बढत्या देता येत नाहीत. बढतीसाठी ग्राह्य असलेल्या अधिकाऱ्यांची संख्या ९८ वर आली आहे. काहींनी बढती नाकारली, काही बढतीची वाट पाहत निवृत्त झाले. यापैकी बहुतांश निरीक्षक ‘एसीपी’ प्रमोशनसाठी इच्छुक असूनही बढत्यांचे आदेश जारी होत नाहीत. बढत्यांचे आदेश काढण्यासाठी चालढकल केली जात असल्याने वरिष्ठ पोलिस निरीक्षकांच्या रांगेत असलेल्या अधिकाऱ्यांची प्रतीक्षा आणखी वाढली आहे. तर, काही जण असेच निवृत्त झाल्याचेही वेळोवेळी दिसून येत आहे. अनेकदा बढती देताना जात प्रमाणपत्र, मराठी, हिंदी भाषेचे, तसेच संगणक प्रशिक्षणाचे (एमएससीआयटी) प्रमाणपत्र, तसेच इतर कागदपत्रांची गृहविभाग, महासंचालक कार्यालयाकडून मागणी केली जाते. मात्र, बढती घ्यायची नसल्याने वारंवार मागणी करूनही काही निरीक्षकांनी या कागदपत्रांची अद्याप पूर्तता केली नसल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
 
दुसरीकडे, अनेक जण सेटिंग लावून सेवा ज्येष्ठता नसतानाही चांगली पोस्टिंग घेताना दिसतात. त्यामुळे काही जणांना पात्र असतानाही पदोन्नतीसाठी हेलपाटे घालण्याची वेळ येते. त्यामुळे काहींनी थेट उच्च न्यायालयाची पायरी चढली आहे. सेवा ज्येष्ठता असूनदेखील ज्युनियर म्हणून काम करण्याची वेळ ओढवल्याचे एका पोलिस निरीक्षकाने सांगितले. जवळपास अडीचशेहून अधिक जणांचा यामध्ये समावेश आहे. 

 

Web Title: when is the time for police transfers and promotions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस