राज चिंचणकर मुंबई : महाराष्ट्रात अनेक वृद्धाश्रम आहेत आणि तिथे मोठ्या संख्येने वयोवृद्ध मंडळी राहतात. या मंडळींना एकाच व्यासपीठावर आणून, त्यांच्या हाती थेट ध्वनिक्षेपक सोपवण्याची अनोखी कामगिरी ‘आपण आनंदयात्री’ परिवाराने करून दाखवली. असे व्यासपीठ मिळाल्यावर या आजी-आजोबांनी विविध कलाविष्कार सादर करत त्यांच्यातल्या ‘तरुणाई’ची झलकही पेश केली. रंगीबेरंगी प्रकाशझोत, संगीतमय व उत्साहाने ओसंडून वाहणारा रंगमंच आणि उत्सवमूर्ती असलेली ज्येष्ठ मंडळी अशा भारलेल्या वातावरणात या आजी-आजोबांच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलेले स्मित लक्षणीय ठरले.
‘आपण आनंदयात्री प्रतिष्ठान’ या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या संस्थेने, मुंबई व मुंबईच्या परिसरातल्या वृद्धाश्रमांत राहणाºया दीडशेहून अधिक आजी-आजोबांना ‘आनंदोत्सव आनंदयात्रींचा’ या अभिनव उपक्रमात सहभागी करून घेत त्यांच्या जीवनात आनंद फुलवण्याचे कार्य केले. पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटरमध्ये महाराष्ट्र दिनी दिवसभर रंगलेल्या या कार्यक्रमात सर जे. जे. धर्मशाळा (नागपाडा), आनंद वृद्धाश्रम (पालघर), शेफर्ड विडोज (भायखळा), रामकृष्ण वृद्धाश्रम (पनवेल), पं. भाऊसाहेब व इंदूताई वर्तक आश्रम (विरार), आधारवड महिलाश्रम (कोपरखैरणे), श्रद्धानंद आश्रम (वसई), साईधाम आश्रम (खिडकाळी), स्मित वृद्धाश्रम (भिवंडी), आनंद आश्रम (नेरूळ), ऑल इज वेल (कोपरखैरणे), अशोकवन (विरार व मुलुंड) आणि ऑल सेंट होम (माझगाव) या वृद्धाश्रमांतल्या ज्येष्ठ मंडळींनी कलाविष्कार सादर केले. नृत्य, संगीत, गायन, वादन, काव्य, अभिनय, चित्रकला, हस्तकला असे अनेक कलाप्रकार या मंडळींनी या वेळी आविष्कृत केले.
ज्येष्ठ साहित्यिक व नाटककार रत्नाकर मतकरी तसेच ज्येष्ठ नाट्यकर्मी व अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे माजी अध्यक्ष अरुण काकडे या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रस्त्यावरील निराधार व्यक्तींवर उपचार करणारे डॉ. अभिजित सोनावणे यांना या सोहळ्यात ‘सामाजिक बांधिलकी २०१९’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, माजी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांना या वेळी ‘आनंदयात्री सामाजिक कर्तव्य पुरस्कार २०१९’ देऊन गौरविण्यात आले. या सोहळ्यात विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आजी-आजोबांना सन्मानित करण्यात आले. ‘आपण आनंदयात्री’चे प्रमोद सुर्वे, विजय सूर्यवंशी, अभय चव्हाण यांच्यासह शेकडो स्वयंसेवी कार्यकर्त्यांनी हा योग जुळवून आणत, ज्येष्ठ मंडळींच्या तनमनावर केलेली आनंदाची पखरण अधिक मोलाची ठरली.