Join us

मेट्रोच्या ‘आयकॉनिक’ पुलांना मुहूर्त कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2020 1:04 AM

रद्द केलेल्या निविदांना पुन्हा चालना : शिवरायांची भवानी तलावर, आकाश यांचे संकल्पचित्र तयार

मुंबई : मुंबईतल्या ब्रिटिशांच्या स्थापत्यशास्त्राचे गोडवे किती दिवस गायचे़ आपल्या स्थापत्य कलेचा ठसाही मुंबईवर दिसायला हवा, या उद्देशाने मुंबईतल्या मेट्रो दोन ब मार्गिकेवर तीन आयकॉनिक पूल उभारणीचा निर्णय एमएमआरडीएने घेतला. आर्यभट्टांची देणगी असलेला शून्य, छत्रपती शिवरायांची भवानी तलवार आणि आकाश या आशयावरील संकल्पचित्र तयार करण्यात आली. या कामांसाठी काढलेली पहिली निविदा प्रक्रिया अपयशी ठरली. त्यानंतर जवळपास पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या महत्त्वाकांक्षी कामासाठी एमएमआरडीएने फेरनिविदा काढल्या आहेत. कोरोना संक्रमणाच्या काळात ही प्रक्रिया यशस्वी होऊन कामांना मुहूर्त मिळेल का, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल.

डी. एन. नगर ते मानखुर्द या २३.६ किमी लांबीच्या मार्गिकांवर तीन ठिकाणी या ‘केबल ब्रिज’ची उभारणी करण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. वाकोला नाल्यावरील पूलसाठी (८० मीटर) शून्याची प्रतिकृती, कलानगर येथील पुलासाठी (७३ मीटर) छत्रपती शिवाजी महाराजांच्या भवानी तलवारीची प्रेरणा देणारी प्रतिकृती, मिठी नदीवरील पुलासाठी (१२० मीटर) अर्धवर्तृळाकार आकाराची अवकाशाचा भास देणारी प्रतिकृती उभारली जाईल असे जाहीर करण्यात आले होते. जुलै, २०१९ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या संकल्पचित्रांचे अनावरण झाले होते. या कामांसाठी सुमारे १८१ कोटी रुपये खर्च होतील असे अंदाजपत्रक तयार करून एमएमआरडीएने १९ सप्टेंबर, २०१९ मध्ये निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. मात्र, त्यासाठी पात्र ठरलेल्या निविदाकारांपैकी लघुत्तम निविदा २३१ कोटी ५५ लाख रुपयांची होती. अंदाजपत्रकापेक्षा २७ टक्के जास्त दराने निविदा आल्यामुळे ती जानेवारी, २०२० मध्ये रद्द करण्यात आली होती. त्यानंतर जवळपास पाच महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या कामांसाठी फेरनिविदा काढण्यात आली आहे. २८ जुलै ही निविदा सादर करण्याची अंतिम मुदत आहे.खोळंब्याचे थांबेच जास्तया मार्गावरील मेट्रो आॅक्टोबर, २०२२ साली सुरू करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन होते. परंतु, या मार्गिकेच्या तीन टप्प्यातल्या कामात दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांना एमएमआरडीएने बाहेरचा रस्ता दाखवला असून रखडलेले काम करण्यासाठी नवा कंत्राटदार त्यांना मिळेनासा झाला आहे. त्या कामासाठी दोन वेळा काढलेल्या निविदांना पुरेसा प्रतिसाद न मिळाल्याने फेरनिविदा काढाव्या लागल्या आहेत. या मार्गिकेवरील तीन आयकॉनिक पुलांच्या कामांसाठीसुद्धा फेरनिविदा मागविण्यात आल्या आहेत. या पुलांच्या कामासाठी पावसाळा वगळून १८ महिन्यांची मुदत दिली जाणार आहे. त्यामुळे जर सध्याची निविदा प्रक्रिया यशस्वी झाली नाही तर पुलांची कामेसुद्धा निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकणार नाहीत. त्यामुळे या मेट्रोची धाव लांबणीवरच पडणार आहे.

टॅग्स :मुंबईमेट्रो