उत्तरपत्रिकांचा डोंगर संपणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2017 05:54 AM2017-08-14T05:54:15+5:302017-08-14T05:54:17+5:30
उत्तर तपासणीचा वेग पाहता स्वत:चा शब्दही पाळण्यात मुंबई विद्यापीठ अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत.
मुंबई : उत्तर तपासणीचा वेग पाहता स्वत:चा शब्दही पाळण्यात मुंबई विद्यापीठ अपयशी ठरण्याची चिन्हे आहेत. कारण १५ आॅगस्टच्या डेडलाइनसाठी दोन दिवस उरले असताना अजूनही दीड लाखाहून अधिक उत्तरपत्रिका तपासणे बाकी आहे. त्यामुळे उत्तरपत्रिकांचा डोंगर संपणार तरी कधी, असा विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनाही प्रश्न पडला आहे.
मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षा या मे महिन्यात संपल्या आहेत. आता या परीक्षा संपून तीन महिने उलटूनही मुंबई विद्यापीठाचे उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झालेले नाही. निकाल लवकर लागावेत म्हणून विद्यापीठाने आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची पद्धत या वर्षी सुरू केली. पण नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे विद्यापीठाच्या अंगाशी आले आहे.
राज्यपालांनी विद्यापीठाला निकाल जाहीर करण्यासाठी दोन डेडलाइन दिल्या होत्या. या डेडलाइन उलटल्यानंतर कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी १५ आॅगस्टपर्यंत सर्व निकाल जाहीर करू, असे आॅगस्ट महिन्याच्या सुरुवातीला स्पष्ट केले होते. त्यातच कुलगुरू डॉ. देशमुख यांना सुट्टीवर पाठवले असून कारणे दाखवा नोटीसही धाडली आहे. त्यामुळे या नोटीसला आता ते काय उत्तर देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आता राज्यपालांनीही कारणे दाखवा नोटीस काढल्याने कुलगुरूंची खुर्ची धोक्यात आली आहे. त्यामुळे त्यांचे समर्थकही आता त्यांच्यापासून लांब झाले आहेत. हे समर्थकही कामातून अंग काढून घेत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
>फक्त साडेआठ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी
मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिकांची तपासणी कासवगतीनेच सुरू आहे. रविवारी, २५० प्राध्यापक उत्तरपत्रिका तपासणीसाठी आले फक्त ८ हजार ७९९ उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण केली आहे. अजूनही १ लाख ६९ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे. दिवसभरात फक्त दोन निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. आतापर्यंत विद्यापीठाचे ३३० निकाल जाहीर झाले असून १४७ निकाल जाहीर करायचे आहेत.