मुंबई पोलिसांना आयर्लंडच्या फेसबुक मुख्यालयातून कॉल येतो तेव्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:15 AM2021-01-08T04:15:19+5:302021-01-08T04:15:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : धुळे परिसरात एकाने ब्लेडने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह केले. ही बाब ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धुळे परिसरात एकाने ब्लेडने स्वतःचा गळा कापून आत्महत्येचे फेसबुक लाईव्ह केले. ही बाब लक्षात येताच, आयर्लंड येथील फेसबुक मुख्यालयातील कर्मचाऱ्याने मुंबई पोलिसांना कॉल करून माहिती दिली. यात मुंबई पोलिसांनी तरुणाचे लोकेशन शोधून धुळे पोलिसांच्या मदतीने त्याचे प्राण वाचविले.
सायबर सेलच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री ८ वाजून १० मिनिटाने आयर्लंडच्या मुख्यालयातून फेसबुक प्रतिनिधीचा फोन आला. त्यांनी ज्ञानेश्वर पाटील (वय २३) नावाच्या तरुणाने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केला असून, त्याला तत्काळ वाचविण्यासाठी विनंती केली. त्यानुसार पथकाने काम सुरू केले. २० मिनिटांत तरुणाचा पत्ता सापडला.
नाशिक जिल्ह्याचे पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर आणि धुळ्याचे पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित यांना याविषयी माहिती दिली. त्यात नऊच्या सुमारास पथक पाटीलच्या घरी पोहोचले. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केल्यामुळे तरुणाचे प्राण वाचले आहेत. पाटील याची आई होम गार्डमध्ये असून, धुळे पोलिसांसाठी काम करते.
घटनाक्रम
रात्री ८.१० - आयर्लंडच्या फेसबुक मुख्यालयातून कॉल
रात्री ८.३० - तरुणाचा पत्ता शोधण्यास यश
रात्री ९.००- तरुणाला मदत
यापूर्वीही वाचले चौघांचे प्राण
१. ऑगस्ट महिन्यात मीरारोड येथील शेफने आर्थिक चणचणीतून गळफास घेत, आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्याने फेसबुक लाईव्ह केल्याने फेसबुकने मुंबई पोलिसांना या विषयी माहिती दिली. चार तासांच्या प्रयत्नानंतर पोलिसांंनी त्याचे लोकेशन शोधून त्याला रुग्णालयात दाखल केले.
२. मॉर्फ केलेले फोटो पॉर्न वेबसाईटवर टाकले म्हणून तरुणीने आत्महत्येचा प्रयत्न केला. याबद्दल माहिती मिळताच पोलिसांनी तिचे समुपदेशन करत प्राण वाचविले.
३. सोशल मीडियावर एकाने कॉल गर्ल म्हणून मोबाईल क्रमांक टाकला म्हणून सांताक्रुझ येथील एका २१ वर्षीय तरुणीने मानसिक तणावातून आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपीचा शोध घेत, तरुणीचे समुपदेशन केले.