मुंबई : देशातील दोन दिग्गज उद्योगपती, साधी राहणी लोकांना नेहमीच भावलेली आहे. ते म्हणजे टाटा उद्योग समुहाचे रतन टाटा आणि इन्फोसिसचे नारायण मूर्ती. या दोघांनीही भारतीय उद्योगाला मोठे भविष्य दिले आहे. त्यांच्या या साधेपणाचा प्रत्यय काल मुंबईमध्ये टायकॉन पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी आला. यावेळी रतन टाटा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आले.
आज रतन टाटा यांचे वय 82 वर्षे आहे. तर नारायण मूर्ती यांचे 72. काल मुंबईमध्ये टायकॉन पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाटा यांना हा पुरस्कार मूर्ती यांच्या हस्ते देण्यात आला. दोघांच्या वयामध्ये दहा वर्षांचे अंतर असले तरीही कमी वयाच्या उद्योगपतीकडून मोठ्या उद्योगपतीला असा पुरस्कार देण्यात आल्याची घटना तशी विरळच. पण मूर्ती यांनी पुरस्कार दिल्यानंतर लगेचच खाली वाकत टाटांच्या पाया पडत आशिर्वाद घेतले. यानंतर उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
यावेळी टाटा म्हणाले की, जे लोक स्टार्टअप कंपन्यांना दिलेली गुंतवणूक बुडवून पसार होत आहेत, त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही. जुन्या काळातील व्यवसाय हळूहळू कमकुवत होत जातील. तसेच इनोव्हेटिव्ह कंपन्यांमधील तरुण संशोधक भारतीय उद्योग विश्वाचे नवे नेते असणार आहेत.
रतन टाटा यांचा हा इशारा अशावेळी आला आहे, जेव्हा अनेक स्टार्टअपवर गुंतवणूकदारांचा पैसा बुडविल्याचा आरोप होत आहे. याला कॅश बर्न असे म्हटले आहे. म्हणजेच भविष्यात फायदा मिळविण्याच्या अपेक्षेतून वारंवार नुकसान सहन करणे. फ्लिपकार्ट व्यवसाय वाढीसाठी दर महिन्याला 1 हजार कोटी रुपये खर्च करत होती.
भविष्यात असे स्टार्टअप मिळतील जे तुम्हाचे लक्ष वेधून घेतील. पैसे गोळा करतील आणि गायब होतील. अशांना दुसरी तिसरी संधी मिळणार नाही. व्य़वसायामध्ये नैतिकता पाळली पाहिजे, असा इशारा टाटा यांनी दिला.