- राज चिंचणकर मुंबई - कोणत्याही नाटकासाठीनाटककार सर्वात महत्त्वाचा असतो. जर नाटककाराने नाटकच लिहिले नाही, तर रंगभूमीवर प्रयोगच होणार नाही. मात्र अलीकडच्या काळात नाटककाराला योग्य तो सन्मान दिला जातो का, असा प्रश्न पडू लागला आहे.: अगदी हेच हेरून, नाट्यसृष्टीतला अवलिया माणूस म्हणून ओळख असलेल्या 'माझा पुरस्कार' फेम अशोक मुळ्ये यांनी, नाटककारांची आवर्जून दखल घेत त्यांना सन्मान मिळवून दिला. 'माझे असेही एक नाट्यसंमेलन - नाटककारांचे' या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत अशोक मुळ्ये यांनी दादर-माटुंगा सांस्कृतिक केंद्रात अधिकाधिक नाटककारांना एकत्र आणले आणि हे संमेलन त्यांच्या खास पद्धतीने यशस्वी केले. संमेलनात त्यांनी आयत्यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी मोहन जोशी यांना अध्यक्षपद; तर ज्येष्ठ कवी प्रवीण दवणे यांना स्वागताध्यक्षपद बहाल केले. नाटककारांना योग्य ते मानधन मिळायलाच हवे, असे मत अशोक मुळ्ये यांनी संमेलनात परखडपणे मांडले. सन १९३०पर्यंत नाटककारांचा योग्य मान राखला जात होता. नाटककारांच्या नावाने तेव्हा नाटके चालायची. त्यांना अत्युच्च दर्जाचा मान असायचा. मात्र आता चित्र बदलले आहे. नाटकाच्या अर्थकारणात तीन टक्केसुद्धा मानधन नाटककाराला आता मिळत नाही, अशी खंत हृषिकेश जोशी यांनी यावेळी व्यक्त केली.. संहिता म्हणजे केवळ ६०-७० पानांचे लेखन नसते; तर ते आयुष्याचे संचित असते. शब्दमाध्यमावर श्रद्धा असायलाच पाहिजे, असे मनोगत प्रवीण दवणे यांनी मांडले. अशोक मुळ्ये यांना आपुलकीने 'स्वामी' असे संबोधणाऱ्या मोहन जोशी यांनी, अशोक मुळ्ये 'यू आर द बेस्ट' म्हणत त्यांचे कौतुक केले. आतापर्यंत मी खूप काही कमावले आणि खूप काही गमावलेही आहे. पण मी तृप्त आहे. यापुढे मी अशोक मुळ्ये यांचा आदर्श ठेवून चालणार आहे, असे सांगत मोहन जोशी यांनी यावेळी मन मोकळे केले. सध्या 'डेड' असलेला 'नाटककार संघ' पुन्हा एकदा जिवंत करू या, अशी साद यावेळी ज्येष्ठ नाटककार आनंद म्हसवेकर यांनी सर्वांना घातली. रंगभूमीवरील दोन पिढ्यांचे नाटककार या संमेलनात सहभागी झाले होते.
जेव्हा नाटककारांची आवर्जून दखल घेतली जाते...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 3:53 AM