माथेरान : चार दशकांपूर्वी १५ दिवस महिनाभर येथे मुक्कामाला असायचो, पण आता इथले आमचे मुख्य आकर्षण असणारी मिनी ट्रेनच बंद असल्याने आम्ही आमच्या नातवंडांचे बालहट्टसुद्धा पुरवू शकत नाही, अशी प्रतिक्रिया वृद्ध पर्यटक मंडळींनी व्यक्त केली असून, माथेरानची ओळख असलेली ही मिनी ट्रेन पुन्हा सुरू करण्याची मागणी या पर्यटकांनी के ली आहे. सध्या शाळेला उन्हाळी सुटी असून, मुला-नातवंडांसह पर्यटक माथेरान येथे येत आहेत. त्यामुळे पर्यटनाचा हंगाम जोरात सुरू झाला आहे; मात्र ‘माथेरानची राणी’ म्हणून ओळखली जाणारी मिनी ट्रेन अद्याप सुरू करण्यात न आल्याने लहानग्यांसह मोठ्यांचाही हिरमोड होत आहे. माथेरानची खरी ओळख ही मिनी ट्रेनमुळेच जगाला ठाऊक आहे. याच मिनी ट्रेनचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येथे येतात. जवळपास २१० नागमोडी वळणे घेत उंच डोंगर-दऱ्यांना हुलकावण्या देत सह्याद्रीच्या पर्वतराजीवर दिमाखाने विराजमान होण्यासाठी चढाई करणारी ही मिनी ट्रेन खऱ्या अर्थाने स्थानिकांसह पर्यटकांचे खास आकर्षण बनलेली आहे. पर्यटक या गाडीचा सहवास लाभावयासाठी येत असतात आणि यातूनच येथील सर्वच मोलमजुरांसह मोठमोठ्या हॉटेल्स व्यावसायिकांना उदरनिर्वाहाचे साधन प्राप्त होत आहे. या गाडीमुळेच माथेरानला जिवंतपणा लाभलेला आहे. परंतु ८ मे २०१६ रोजी बोगीचे ब्रेक फेल होऊन एकाच जागी दोनदा बोगी घसरली होती. त्यामुळे ही सेवाच बंद करण्याचा निणय रेल्वे प्रशासनाने घेतला. येथे येणारे पर्यटक हे येथील निसर्गाशी एकरूप होण्याच्या आस्थेने येत असतात. मात्र मिनी ट्रेन बंद झाल्याने पर्यटन व्यवसायावर याचा परिणाम दिसून येत आहे. तसेच भर उन्हातान्हात पैशांच्या कमी बजेटमुळे दस्तुरीपासूनच ३ किमीची गावापर्यंत पायपीट करीत येत आहेत. परंतु रेल्वे प्रशासनाला याचे सोयरसुतक नसल्याचे स्पष्ट दिसत आहे. (वार्ताहर)
माथेरानची राणी धावणार कधी?
By admin | Published: April 19, 2017 1:02 AM