'त्या' बंडखोर भुजबळांसोबत कॅबिनेटमध्ये बसता तेव्हा, शिंदे समर्थकाचा पक्षप्रमुखांना सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 12:03 PM2022-06-26T12:03:42+5:302022-06-26T12:33:47+5:30
दिपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेत आत्तापर्यंत तीन मोठे बंड झाल्याचे सांगितले.
मुंबई - शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या गटाचे प्रमुख प्रवक्ते असलेल्या दिपक केसरकर यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी, पत्रकारांच्या अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली. राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिवसेना आमदारांची होणारी गळचेपी आणि त्यांच्या पराभूत उमेदवारांना दिलं जाणारं पाठबळं पाहता, आमदारांनी बंड केल्याचं ते म्हणाले. काहीही झालं तरी शिवसेनेनं महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, अशी मागणीही त्यांनी केली. त्यासोबतच, पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक करत त्यांना मातोश्री आणि बाळासाहेबांबद्दल प्रचंड आदर असल्याचंही ते म्हणाले.
दिपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना शिवसेनेत आत्तापर्यंत तीन मोठे बंड झाल्याचे सांगितले. छगन भुजबळ यांनी शिवसेनेतं पहिलं बंड केलं होतं. या बंडामागे कोणाचा अदृश्य हात होता, हे सर्वांनाच माहिती आहे. तरीही, आज ते कॅबिनेटमध्ये आहेत, असे म्हणत केसरकर यांनी शिवसेना पक्षप्रमुखाना इतिहास सांगितला.
शिवसेना छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी फोडली. प्रत्येकवेळेला त्यामागे एक अदृश्य होत होता, ते तुम्हाला माहितीय. भुजबळ हे काय बोलत होते, नारायण राणेही काय बोलत होते. बाळासाहेबांना अटक करण्याबाबत भरसभांमध्ये बोलले. मात्र, त्यांच्यासोबत आपण कॅबिनेटमध्ये बसतो हाही एक विचित्र अनुभव आहे, असे म्हणत दिपक केसरकर यांनी यापूर्वीच्या बंडखोर शिवसेना नेत्यांची यादी सांगितली. तसेच, शरद पवार यांचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीकडून शिवसेना फोडली जात असल्याचा आरोपही केला.
दरम्यान, बाळासाहेब ठाकरे कधी खुर्चीत बसले नाहीत, त्यांच्यात तो मोठेपणा होता, तो मोठेपणा उद्धव ठाकरेंसमध्येही आहे. पण, त्यांना जबरदस्तीने खुर्चीवर कोणी बसवलं, तर शरद पवारांनी, असेही केसरकर यांनी म्हटलं.
भाजप शिवसेनेनं एकत्र राहिले पाहिजे
मी राष्ट्रवादीतच होतो, माझे सर्वच नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मात्र, माझ्या एकट्याचे संबंध असून काय उपयोग. आमचे आमदार राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलचे गाऱ्हाणे आमच्याकडे मांडत होते. मी कोकणात एवढी मोठी लढाई केली. मलासुद्धा पंतप्रधान कार्यालयातून बोलाविण्यात आलं होतं. मी का नाही गेलो, कारण मराठी माणसाच्या मागे शिवसेना उभी राहते. मराठी माणसाच्या हक्कासाठी शिवसेना लढते. मी दिल्लीवरुन एवढ्या मोठ्या माणसाला न भेटता परत आलो. विशेष म्हणजे मी सुरुवातीपासूनच पक्षप्रमुखांना सांगत आहे की, भाजप आणि शिवसेनेनं एकत्रच राहिलं पाहिजे.
मातोश्रींबद्दल मोदींना अतिशय प्रेम
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान जेव्हा एका दिशेने चालतात तेव्हा ते राज्य मोठं होतं. महाराष्ट्र हे देशाची आर्थिक राजधानी असलेलं राज्य आहे. ज्यावेळेला महाराष्ट्र मोठा होईल, भारतसुद्धा मोठा होईल. पंतप्रधान मोदींना मातोश्रीबद्दल आणि बाळासाहेबांबद्दल अतिशय प्रेम आहे. तसं असतानाही केवळ राज्यातील कोणी आपल्याला त्रास देत आहे, म्हणून भूमिका वेगळी घेतली. पण, ते तिथं बोललं जाऊ शकलं असतं, असेही दिपक केसरकर यांनी म्हटलं आहे.